नालासोपारा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर आवर्जून सोने खरेदी केली जाते, परंतु कोरोना निर्बंधांमुळे ज्वेलर्स दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. काही सोने व्यापाऱ्यांनी ऑनलाइन खरेदी, दूरचित्र संवाद माध्यमातून विक्रीचे पर्याय अंमलात आणले होते, परंतु सोने ऑनलाइन खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. गुढीपाडव्यावर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षभरात सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सुवर्ण विक्रीची संधी सराफ बाजाराला साधता आली नाही. सोन्याचे दर काही दिवसांपासून कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची व्यापाऱ्यांना आशा होती, मात्र बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अनेक व्यापारी ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरचित्र संवाद माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोन्यासह अन्य मौल्यवान धातूंचे दागिने व वस्तू विक्रीतील काही मोठ्या ब्रँडने ऑनलाइन खरेदीचा पर्याय ग्राहकांना दिला आहे. दरम्यान, किमान पाडव्याला तरी सोने-चांदीची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी छोट्या ज्वेलर्स मालकांनी तुळींज पोलिसांना सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यात येऊन केली.
गेल्या वर्षीही पाडव्याला ज्वेलर्स दुकाने बंद होती. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सोने विक्री व्यवसायाची अवस्था बिकट झाली असून बाजारात पैसे अडकले आहेत. लोकांचे दागिने बनवून तयार आहेत, पण सगळे व्यवहार ठप्प आहेत. – गौरव बडोला, ज्वेलर्स व्यावसायिक, नालासोपारा