--------------
रक्तदात्यांनी जपली सामाजिक बांधीलकी
कल्याण : कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असून थॅलिसीमियाग्रस्त मुलांच्या रक्ताचीही तूट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध सामाजिक संस्था, महापालिका कर्मचारी, पत्रकार आणि अनेक नागरिकांनी यात सहभागी होत ५५ हून अधिक जणांनी सामाजिक बांधीलकी जपल्याचे दिसून आले. थॅलेसीमियाग्रस्त मुलांना रक्तपुरवठा करणाऱ्या ठाण्यातील रोटरी क्लबच्या ब्लड बँकेकडे हे रक्त जमा करण्यात आले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापालिका सचिव संजय जाधव, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली आदींचे या सामाजिक उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
फोटो आहे.
---------------
एमआरटीपीअंतर्गत कारवाई करा
कल्याण : मानपाडा हद्दीतील पिसवली-गोळवली येथील आंबेडकर स्तंभासमोरील सामाजिक उपक्रमासाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. त्याठिकाणी उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात आय प्रभाग कार्यालयात तक्रार केली आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये असंतोष आहे. १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आंबेडकर स्तंभाजवळील जागा कार्यक्रमासाठी कमी पडत असल्याने तत्काळ तेथील अतिक्रमणावर एमआरटीपीअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) कल्याण शहराध्यक्ष संजय जाधव यांनी केडीएमसीच्या अनधिकृत बांधकाम विभागाकडे केली आहे.
---------------
मास्क, सॅनिटायझरचे वाटप
कल्याण : कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (कामा) च्या सहकार्याने आरएसपी अधिकारी युनिटचे कमांडर मणिलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण एसटी आगारातील वाहक, चालक, कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी आणि तांत्रिक विभागातील कर्मचारी तसेच सफाई कामगार आदी २५० कामगारांना प्रत्येकी दोन मास्क आणि सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
---------------
काका मांडले यांचे निधन
कल्याण : केडीएमसीचे माजी नगरसेवक, सभागृहनेते तथा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक (काका) मांडले यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. मांडले यांच्या पार्थिवावर लालचौकी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मांडले हे १९९५ ते २००० या कालावधीत नगरसेवक होते.
---------------
म. फुलेंना अभिवादन
कल्याण : महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी केडीएमसी मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि फुले अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महापालिका सचिव संजय जाधव, क प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
-------------