अंबरनाथ : मागील महिन्यात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करून सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली.
याप्रकरणी कळवा येथील शांतीनगर भागातील प्रथमेश उर्फ पिल्ल्या ठमके (२२) याला अटक करण्यात आली आहे. मागील महिन्यात २६ ऑगस्ट रोजी अंबरनाथच्या शिवलिंगनगर भागात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका दुकानातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला होता. भरदुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली होती. या घटनेचा तपास करणारे तपास अधिकारी उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हेगारांचा तपास सुरू केला असता प्रथमेश ठमके याने सोनसाखळी चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. चोरलेली सोन्याची साखळी ठमके याने मुंब्रा येथील त्याच्या दुसऱ्या साथीदाराला विक्रीसाठी दिल्याचे तसेच ठमके याच्या विरोधात पाच विविध पोलीस स्थानकांत गुन्हे दाखल असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त उमेश पाटील यांनी दिली. अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडे यावेळी उपस्थित होते.