कल्याण : सोनसाखळी आणि वाहनचोरीच्या घटना एकीकडे वाढल्या असताना या गुन्ह्यांतील अब्दुल्ला संजय इराणी उर्फ सय्यद (वय २२) या सराईत चोरट्याला आंबिवली परिसरातून अटक केली आहे. खडकपाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडून १० लाख ४० हजार रुपये किमतीच्या १६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने आणि पोलीस उपनिरीक्षक योगेश गायकर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर दाभाडे यांच्या पथकाने कसोशीने केलेल्या तपासात आरोपी अब्दुल्लाकडून १६ दुचाकींसह एक लाख ७५ हजार रुपये किमतीचे चोरीचे सोन्याचे दागिनेही हस्तगत केले गेले आहेत.
१३ जूनला आंबिवली मोहने परिसरातील पाटीलनगर येथे अब्दुल्लाला अटक करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे या सराईत चोरट्याविरोधात ठाणे पोलीस आयुक्तालय व परिसरात ५६ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
--------------------------
मंदिरात चोरी करणारे जेरबंद
- पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील हनुमान मंदिरात चोरी करून तेथील पूजेच्या अडीच हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या वस्तू चोरणारे इरफान अहमद अली खान (वय २३) आणि फैजल फिरोज खान (वय २७, दोघेही रा. गोवंडी) यांना हाजीमलंग रोड परिसरातून सोमवारी मध्यरात्री अटक करण्यात आली.
- कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस कर्मचारी त्या परिसरात गस्त घालत असताना हे दोघे चोरटे संशयितरीत्या फिरताना आढळून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे बाळकृष्ण मूर्ती, घंटी, पंचआरती, गदा, दिवा, ताट, चमचा आचमणी आदी तांब्याच्या वस्तू सापडल्या.
- दरम्यान, हनुमान मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी विनीत उपाध्याय यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे यांनी दिली.
-------------------