डोंबिवली : पश्चिमेकडील नवापाडा, सुभाष रोड परिसरातील नीलकंठ विहारमध्ये राहणाऱ्या अनिता राऊळ या १६ मे रोजी पहाटे ५.३० च्या दरम्यान त्यांच्या पतीसमवेत मॉर्निंग वॉकसाठी भागशाळा मैदान येथून जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याची दोन मंगळसूत्रे दुचाकीवर आलेल्या चोरट्याने खेचून पलायन केले होते. यातील आरोपी फजल आयुब कुरेशी (वय २५, रा. सूचकनाका, कल्याण पूर्व) याला नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याचा ताबा विष्णूनगर पोलिसांनी घेतला आहे. त्याने चोरलेली दोन्ही मंगळसूत्रे त्याच्याकडून जप्त केली आहेत, अशी माहिती विष्णूनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा ताबा घेऊन चोरलेला सर्व माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
--------------