कल्याण : सोन्याची द्वारका आपण पौराणिक कथा, पोथ्यापुराणात वाचली आहे. मात्र, एनआरसी कंपनी व कॉलनीत द्वारकेइतकीच सुबत्ता नव्वदच्या दशकात होती. कामगारांना उच्च प्रतीचे दूध मिळावे याकरिता मालकाने गायी-म्हशी पाळल्या होत्या व डेअरी टाकली होती. कॅन्टीनमध्ये ६० पैशात राइसप्लेट, एक रुपयात मांसाहार, १० पैशात नाश्ता वर्षानुवर्षे मिळत होता. महिन्याकाठी केवळ दोन रुपये भरून क्लब हाऊसमध्ये टेनिसपासून बिलियर्डपर्यंत सारे खेळ खेळता येत होते. इंग्रजी- मराठी, गुजराती माध्यमाची शाळा, मोफत हॉस्पिटल, घसघशीत पगार आणि बोनस, अशी सगळी सुखे या कॉलनीत पायाशी लोळत होती. एकेकाळी अनेकांनी रेल्वेची सरकारी नोकरी नाकारून एनआरसीची नोकरी पत्करण्यामागे याच सोयी-सुविधांचे आमिष होते; परंतु जशी द्वारका बुडाली, तशी एनआरसी बुडाली आणि आज उरली विपन्नता आणि रिकाम्या पोटी सुरू असलेला विलाप.
आंबिवली मोहनेनजीक ४४० एकर जागेवर रसिकलाल चिनॉय यांनी १९४६ साली एनआरसी कंपनीची पायाभरणी केली. कंपनीची उभारणी करण्यास चार वर्षे लागली. १९५० साली कंपनीत प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. कंपनीत कापडासाठी धागा तयार केला जात होता. रेयॉन, टायर कोट आणि त्यानंतर नायलॉन तयार होऊ लागले. सुरुवातीला केवळ पाच टनाचे उत्पादन घेतले जात होते. त्यावेळी कंपनीत एक हजार कामगार होते. कंपनी २००९ मध्ये बंद करण्यात आली. त्यावेळी कंपनीत ४० टनाचे उत्पादन घेतले जात होते. त्याचबरोबर बारा प्रकारचे बायप्रॉडक्टस् होते. कंपनी बंद पडली तेव्हा कंत्राटी व कायम मिळून ४,५०० कामगार होते. चिनॉयकडून ही कंपनी कापडिया यांनी घेतली. त्यानंतर जी.पी. गोयंका यांनी घेतली. कंपनी बंद पडली तेव्हा गोयंका यांचे व्यवस्थापन होते.
कंपनी उत्पादनाकरिता कच्चा माल म्हणून लगदा लागत होता. हा लगदा बांबूपासून तयार होतो. त्याकरिता कंपनीने ३५ एकर जागेवर बांबू प्लॉट विकसित केला होता. त्यात बांबूची शेती केली जात होती. आजही तो परिसर बांबू प्लॉट म्हणून ओळखला जातो. लगद्यासाठी लागणारा कागद हा केरळमधून मागविला जात होता.
कंपनीच्या कामगारांकरिता कामगार वसाहत उभारली होती. त्यात किमान ८०० कामगार आणि अधिकारी राहत होते. अधिकाऱ्यांकरिता बंगलेवजा घरे होती. कामगारांच्या मुलांकरिता पहिली ते दहावीपर्यंतची शाळा ही इंग्रजी, मराठी आणि गुजराती माध्यमाची होती. आजही शाळेची इमारत उभी असून, शाळा सुरू आहे. कंपनीच्या क्लब हाऊसमध्ये महिन्याकाठी पासकरिता दोन रुपये मोजावे लागत होते. त्यात इनडोअर गेममध्ये टेबल टेनिस, टेनिस, बास्केटबॉल, बिलियर्ड, पत्ते, कॅरम आदी खेळाच्या सुविधा होत्या. त्याचबरोबर कामगारांसाठी सुसज्ज ६० खाटांचे रुग्णालय होते. मुंबईतील शिवडी सोडले, तर टीबी उपचारासाठी स्वतंत्र कक्ष केवळ येथे होता. कंपनीच्या भल्यामोठ्या कॅन्टीनमध्ये एकाचवेळी ६०० पेक्षा जास्त कामगार जेवण घेत. अत्यंत कमी दरात येथे जेवण, नाश्ता मिळायचा. रेशनिंगकरिता ग्राहक सोसायटी व गॅस एजन्सी होती. कंपनीच्या कामगारांचा दिवाळीचा बोनस झाला की, कंपनी परिसरातील दुकानदारांची ‘दिवाळी’ होत असे. गेल्या १० वर्षांपासून कंपनीला घरघर लागली आणि ही सोन्याची द्वारका बुडाली.
-----------------