डोंबिवली- मुंबई वरळी येथे नुकत्याच पार पडलेल्या 27 व्या ऑल इंडिया जी. वी. मावळकर शूटिंग चॅम्पियनशीप 50 मीटर फ्री पिस्टल इव्हेंटमध्ये डोंबिवलीतील विकास शिवाजी पोटे या तरुणाने सुवर्ण कामगिरी केली आहे. पुरुष कॅटेगरीतून 300 पैकी 261 गुण पोटेला मिळाल्याने तो सुवर्ण पदाची मानकरी ठरला आहे. भारतातून आलेल्या 110 शूटर्सना पोटे याने मागे टाकले आहे.ही स्पर्धा नुकतीच 25 सप्टेंबर रोजी वरळी पार पडली. पोटे याने 2015 साली नेमबाजी खेळाला सुरुवात केली. ठाण्यातील शूटिंग रेंजमध्ये त्याने सुरुवातीला एक महिना सराव केला. डोंबिवलीतील शूटिंग रेंजला त्याने भेट दिली. तेव्हा त्या ठिकाणी पुण्यातील गन फॉर ग्लोरीची शाखा सुरू झाल्याचे समजले. त्या ठिकाणी रेंजचे व्यवस्थापन चांगले असल्याने त्याने चांगली तयारी करण्याचा विचार मनाशी पक्का केला. खेळ खर्चिक असला तरी त्यावर मात करायची आणि कौशल्य हस्तगत करण्याचा चंग मनाशी बांधला. 2016 साली त्याने प्रथमच शूटिंग रेंजमध्ये सहभाग घेतला. पहिल्याच स्पर्धेत 400 पैकी 366 गुण मिळविले. त्यावेळी त्याला पहिलेच सुवर्ण पदक मिळाले. त्यामुळे त्याला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली.26 व्या जी. वी मावळकर शूटींग स्पर्धेत 10 मीटर अतरांच्या नेमबाजीत 400 पैकी 380 गुण मिळविले. त्याठिकाणी त्याचे सुवर्ण पदक हुकले. मात्र रौप्य पदक मिळाले. त्यानंतर 60 व्या नॅशलन शूटिंग रेंज स्पर्धेत 10 मीटरच्या रेंजमध्ये नेमबाजीकराता नॅशनल क्वालीफाई झाला. रेनॉड शॉट शूटर ही उपाधी मिळाली. 50 मीटरचा पल्ला त्याने पार करीत सुवर्ण पदक मिळाविल्याने त्याला आत्ता ऑलंपीक स्पर्धेचे वेध लागले आहे. त्याचे पुढील लक्ष्य औलंपिक खेळाचे आहे. त्यात सहभागी होऊन देशाला सुवर्ण पदक मिळवून देण्याचा मानस त्याने व्यक्त केला
शूटिंग चॅम्पियनशिप 50 मीटर फ्री पिस्टल स्पर्धेत डोंबिवलीच्या तरुणाची सुवर्ण कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 5:06 PM