ठाणे : गुजरातला सोन्याचे दागिने पुरवठा करण्याच्या बहाण्याने राजेश पारेख याने जयेश रावल (३५) यांचे ७१ लाख १८ हजार ४९१ रुपयांचे ११५९.५९० वजनाचे सोन्याचे दागिने लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रावल यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पवन गोल्ड फर्मचे मालक जयेश यांचा मोठा भाऊ राजेंद्र रावल हा झवेरी बाजार येथे रिंकार ज्वेलर्स आणि इतर ज्वेलर्सकडे कमिशनवर कामाला आहे. तो २०१५ मध्ये रॉयल चेन फर्म, झवेरी बाजार येथे कामाला असताना त्यांची ओळख राजेश पारेख याच्याबरोबर झाली. त्याने सुरुवातीला दीड किलो सोन्याचे दागिने गुजरातला पाठविण्यासाठी खरेदी केले. त्याचे पैसेही त्याने रोख स्वरूपात दिले. जानेवारी २०२३ पासून त्याच्याशी राजेंद्र रावल यांची चांगली ओळख झाली. यातूनच त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर राजेश याने त्याला १,२०० ग्रॅम दागिने पाहिजे असून ते गुजरातला पाठवायचे सांगितले.
- राजेंद्र यांनी त्याला झवेरी बाजारातून सोने खरेदी करून दिले. ते दागिने २ जुलै २०२३ रोजी तीन हात नाका येथील शरणम हॉटेल येथे त्याला दिले.- त्याला ७१ लाख १८ हजार ४९१ रुपयांचे २२ कॅरेटचे कानातील बुटी, गळ्यातील हार, लेडीज ब्रेसलेट, लेडीज अंगठी आणि नेकलेस असे ११५९.५९० वजनाचे सोन्याचे दागिने पारेख बंधूंनी दिले. हे दागिने त्याने परत केले नाहीत. पैसेही दिले नाहीत. - शिवाय, राजेश पारेख याला गायब करून, मारून टाकीन किंवा आत्महत्या करून तुमच्या नावाचे पत्र लिहून ठेवेन, अशी धमकीच त्याला दिली. या सर्व प्रकाराला कंटाळल्यानंतर जयेश रावल यांनी राजेश पारेख याच्याविरुद्ध फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा १ जानेवारी रोजी दाखल केला आहे.