डोंबिवली : अबकारी कर लागू केल्याच्या निषेधार्थ २ मार्चपासून सुरू असलेला सराफांचा देशव्यापी बंद मागे न घेतल्याने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या सोनेखरेदीच्या परंपरेत शुक्रवारी खंड पडणार आहे. संपामुळे आतापर्यंत राज्यभरात सराफांचे ७० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा संंघटनांनी केला आहे. महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे अध्यक्ष अनिल वाघाडकर यांनी सांगितले की, सराफांनी अद्याप बंद मागे घेतलेला नाही. दुकाने बंद असल्याने अनेकांना सोनेखरेदीचा मुहूर्त साधता येणार नाही. त्यामुळे यंदाचा पाडवा सोन्याविनाच साजरा करावा लागेल. पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांनी संपाची दखल घेतलेली नाही. साधी चर्चा करण्यास ही मंडळी तयार नाहीत. इतक्या मोठ्या व्यापारावर त्यांनी पाणी फिरवले आहे. त्यामुळे सराफांनी भाजप सरकारचा निषेध केला आहे. भाजप सरकार हे हिंदूधर्मविरोधी असल्याचा प्रत्यय या निमित्ताने आल्याचा आरोप सराफांनी केला. चर्चेसाठी शिवसेनेच्या १६खासदारांनी वेळ मागितली होती. त्यासाठीही सरकारने वेळ दिला नाही. आमच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे. लवकरच महारॅली काढण्यात येणार आहे. त्याची तारीख शुक्रवारी ठरविण्यात येणार असल्याचे वाघाडकर यांनी सांगितले.
सराफांच्या संपामुळे सोने काळवंडले
By admin | Published: April 08, 2016 1:39 AM