ठाणे : "गोल्डा मेयर" यांना दूरदृष्टी होती. भारत व इस्त्रायल यांच्या भविष्यातील चांगले संबंधाबाबत त्यांना आधीच कल्पना होती, त्यांना भविष्यकाळाचा चांगला अंदाज होता. १९७१ मध्ये भारत -पाक युध्दात त्यांनी भारताला सपोर्ट केला होता असे प्रतिपादन इस्त्रायलचे भारतातील वाणिज्य दुतावासातील उपमुख्याधिकारी निमरोद कलमार यांनी कान्स. हे पुस्तक मराठीत काढले त्याबदल त्यांनी आनंद व्यक्त केला.
जागतिक ग्रंथ दिनाचे औचित्य साधून मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे आणि इंडस सोर्स बुक्स यांच्या विद्यमाने वीणा गवाणकर लिखित "गोल्डा: एक अशांत वादळ" या इस्त्रायलच्या माजी पंतप्रधान "गोल्डा मेयर" यांच्या चरित्रग्रंथाचा प्रकाशन समारंभ मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सुप्रसिध्द ज्येष्ठ पत्रकार निळू दामले, इस्त्रायलचे भारतातील वाणिज्य दुतावासातील उप-मुख्याधिकारी निमरोद कलमार, संस्थेचे अध्यक्ष प्रा.विद्याधर वालावलकर व कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर उपस्थित होते. मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे चे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. "ग्रंथदिनाच्या मुहुर्तावर"वाचनकट्टा" असा अभिनव कार्यक्रम दरमहिन्याला करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. ग्रंथ, लेखक आणि वाचक यांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम असेल, असे त्यांनी सांगितले. “इंडस सोर्स बुक्स: च्या सोनवी देसाई यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. पुस्तक हे संवाद साधण्याचा महत्वाचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. इंड्स सोर्स बुक्स प्रकाशन इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेतून पुस्तके प्रसिध्द करतात. लेखिका वीणा गवाणकर आपल्या भाषणात म्हणाल्या "मला इंड्स सोर्स बुक्स" च्या देसाई यांनी गोल्डा मेयर यांच्यावर लिहिण्यास सांगितले, तेव्हा प्रथम मी नकार दिला. कारण मी राजकीय लेखन करत नाही, पण गोल्डा मेयर यांचा एक स्त्री म्हणून आपण विचार करावा असे मला वाटले. त्यांचा संघर्ष व त्यांचा कणखरपणा मात्र भावला होता. ज्यू निर्वासित, अरब निर्वासित यासाठी त्यांनी केलेले कार्य खूप मोठे आहे. हे सर्व लिहायचे तर खूप अभ्यासाची आवश्यकता होती. वयाच्या सत्तरीनंतर आपणास हे जमेल का? असा प्रश्न त्यांना पडला डॉक्टरांनी त्यांना दिलासा दिला. व तुम्ही हे करू शकाल असा विश्वास दिला गोल्डा मेयर वयाच्या ७५ व्या वर्शी पंतप्रधान झाल्या व खूप मोठे काम त्यांनी केले. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पुस्तक लेखनाचे काम हाती घेतले व पूर्ण केले.
पत्रकार निळू दामले म्हणाले "इस्त्रायलच्या त्या काळातल्या मंत्रिमंडळात गोल्डा मेयर ह्या एकमेव "महिला" मंत्री होत्या.त्यांचा कणखरपणा हा त्यांच्या जीवन संघर्षातून व कौटुंबिक तणावातून आला होता. ते पुढे म्हणाले इस्त्रायलची निर्मिती ही त्यावेळची एक राजकीय गरज होती. भारत व इस्त्रायल दोन्ही देशांच्या समस्या, अडचणी सारख्याच आहेत. मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी महाराष्ट्रातील ज्यू समाजाने मराठी साहित्यात बरेच योगदान दिले असल्याचे सांगितले. ज्यू लेखकांकडून मराठीमध्ये २२ नियतकालिके चालवली जातात असे त्यांनी सांगितले.निमरोद कलमार यांनी या कार्यक्रमास येण्याचे मान्य केल्याबद्दल प्रा. विद्याधर वालावलकर यांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. प्रतिक्षा बोर्डे यांनी अतिशय समर्पकपणे केले. कार्यकारीणी सदस्य संजीव फ़डके यांनी आभार मानले.