विक्रमगड : कावळ्यांसाठी सध्या अच्छे दिन आले आहेत. म्हणजेच पितृपक्ष सुरु आहे तरी रावण्या करूनही व इच्छित खाद्य, पेय ठेवले तरी ते पितरांसाठी ठेवलेल्या ताटाला स्पर्श करीत नसल्याने शेवटी कंटाळलेल्या आप्तांना नैवेद्य दाखवून श्राद्वाचे भोजन खावे लागते आहे. याला कारण कावळ्यांची घटलेली संख्या ही आहे. कावळे कमी नैवेद्य जास्ती, त्यामुळे खायचे तरी किती? असा प्रश्न कावळ्यांना पडत असावा.गणेशोत्सवानंतर लगेचच पितृ पंधरवडा सुरु होतो़ या दिवसांत आपल्या पूर्वजांना नैवेद्य (घास ठेवण्याची) रुढी परंपरा खूप जुन्या काळापासुन आजही चालत आलेली असून ती ग्रामीण भागत नव्हे तर शहरी भागातही दिसते़ या दिवसांत पितरांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींना त्यांच्या आवडीची फळे, वस्तू आणि जेवण (मद्यसुद्धा) वाढून ते कावळयांच्या रुपाने त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची परंपरा आहे़ त्यासाठी प्रत्येकजण आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या मृत्यू तिथीनुसार नैवेद्य देतो़ या दिवसांत महत्व असते ते कावळयांना. कावळा या नैवेद्याचा घास घेईतो घरातील कुणीही जेवणास बसत नाहीत़आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे़ एरवी मिळेल त्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पंधरवडयात खाऊन सुस्तावलेला दिसून येतो़ सध्याच कावळयांची संख्याच कमी झाल्याने ़पितरांच्या नैवेद्याला शिवण्यासाठी कावळयांना साद घातली तरी ते फिरकेनासे झाले आहेत़ त्यामुळे ब-यांचदा केवळ साकडे घालून किंवा पितरांना नैवैद्य दाखवून जेवण आटपावे लागते़ याचे घरातल्या बुजुर्गाना दु:ख वाटते़ (वार्ताहर)
‘अच्छे दिना’तही कावळे घटले, श्राद्धविधी संकटात
By admin | Published: September 23, 2016 2:44 AM