भिवंडी : काँग्रेसच्या राज्यात भिवंडीमध्ये अच्छे दिन होते. येथील पॉवरलूम व्यावसायिकांसाठी वीज युनिटचे दर कमी केले होते. तर बँक कर्ज माफ केले. वीजबिलात सबसीडी दिली होती. मात्र जीएसटी व वीजदरवाढीने या व्यवसायाचा कणा मोडला. हा व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी काँग्रेस सत्तेत येणे आवश्यक आहे,असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले.राज्यात काँग्रेसतर्फे सुरू झालेल्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप भिवंडीत झाला. या प्रसंगी व्यासपीठावर खासदार हुसेन दलवाई, आमदार आरीफ नसीम खान, आमदार हरिभाऊ राठोड,पक्षाचे प्रभारी पी. संदीप, माजी खासदार सुरेश टावरे,सरचिटणीस प्रदीप रांका, शहराध्यक्ष शोएब खान आदी उपस्थित होते. भाजपा सरकारवर त्यांनी टीका केली. जनसंघर्ष यात्रा १२४ तहसील क्षेत्रातून ६५०० किलोमीटर अंतरामध्ये विविध ठिकाणी जनसभा घेतल्याचे ते म्हणाले.दरम्यान, महापालिकेत काँग्रेसचे ४७ नगरसेवक आहेत. परंतु गटबाजीमुळे शहराध्यक्षाच्या गटातील नगरसेवक समारोप यात्रेत सहभागी झाले होते. या गटबाजीमुळे भाषण सुरू असतानाच सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी मैदानातून बाहेर पडायला सुरूवात केली. चव्हाण यांचे भाषण संपेपर्यंत अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. यावेळी पक्षाचे अन्य पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात निघालेल्या बाईकरॅलीमुळे काहीकाळी वाहतूककोंडी झाली होती.एलईडी स्क्रीन कोसळलासभा सुरू असताना मैदानात वेगाने वारा सुरू होता. खा. चव्हाण हे कार्यक्रम संपवून गाडीत बसत असतानाच मैदानातील एलईडी स्क्रीन कोसळळा. यामध्ये कर्मचारी जखमी झाला.
काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये भिवंडीत होते अच्छे दिन- अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:51 AM