ठाणे : ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासह अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने केलेल्या बचाव कार्यामुळे एका १७ वर्षीय तरुणाचे प्राण वाचले आहे. फरदीन खान असे या तरुणाचे नाव असून साकेत जवळील बीएमसीच्या पाण्याच्या लाईन वरून तो सोमवारी खाडीत तोल जाऊन पडला होता.
दिवसभरात पावसाचा जोर कायम असतानाच रात्री ९.३० च्या सुमारास साकेत, महालक्ष्मी मंदिर जवळ ठाण्याकडे येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाईपलाईन वरील ब्रीज वरून फरदीन (१७ वर्ष) हा मुलगा खाली खाडीत पडला होता. याबाबतची तक्रार आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. पावसाची संततधार सुरू असतानाही दोन तास शोध मोहीम राबवत त्याला बोटीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. फरदीन खान हा राबोडी , क्रांतीनगर येथील रहिवासी आहे.