लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास दोन महिने अवकाश असताना केंद्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर कृपावर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी ठाणे शहराच्या अंतर्गत रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. २०२९ पर्यंत पूर्ण होणारा हा प्रकल्प १२ हजार २०० कोटी रुपयांचा आहे.
याबाबत केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, ठाणे शहराच्या अंतर्गत असलेल्या मेट्रो रेल्वेच्या मार्गाची लांबी २९ किमी आहे. या मार्गामुळे नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट्स, कोलशेत, साकेत इ. भाग जोडले जाणार आहेत. ठाणे पश्चिम येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात २२ स्थानके असतील.
या प्रकल्पामुळे ठाणे शहराला वाहतुकीचे उत्तम साधन उपलब्ध होईल. १२ हजार २०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात केंद्र व राज्य सरकारची समसमान भागीदारी असेल. तसेच या निधीतील काही रक्कम अन्य वित्तीय संस्थांकडून उभारण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे मेट्रो फेज-१ प्रकल्पाच्या सध्याच्या पीसीएमसी-स्वारगेट मेट्रो लाइनच्या स्वारगेट-ते-कात्रज भूमिगत लाइन विस्ताराला मंजुरी देण्यात आली आहे. हा नवीन विस्तार लाइन-१ बी या नावाने ओळखला जाईल व या मार्गाचा ५.४६ किमीपर्यंत विस्तार केला जाईल. त्यात तीन भूमिगत स्थानके असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्याच भावनेतून ठाणे शहरात अंतर्गत रिंग मेट्रो रेल्वे मार्ग उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पुणे मेट्रो फेज-१च्या विस्तारीकरणालाही मंजुरी देण्यात आली. पुणे हे देशातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. त्याचा विकास करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.
- पुण्यातील मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजीनगर आणि कात्रज परिसरातील ठिकाणे या मार्गाने जोडली जाणार आहेत.
- हा प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी २९५४.५३ कोटी रुपये खर्च येणार आहे.
- बंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील दोन कॉरिडॉरच्या बांधणीसही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे त्या शहरातील मेट्रो वाहतूकही अधिक विस्तारणार आहे.