सुरेश लोखंडे, ठाणे: आरटीईच्या २५ टक्के आरक्षणाच्या शालेय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १०मेपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यास अनुसरून पात्र बालकांच्या सर्व पालकांनी या मुदत वाढीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे. गुरूवारपर्यंत चार हजार ४५० अर्जांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. तर १४ हजार ९६५ अर्जांची नोंदणी अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे.
या मुदत वाढ संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र असणाऱ्या एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी या वंचित गटासह आर्थिक दुर्बल गटातील पालकांसाठी त्यांच्या बालकांचे अर्ज https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या वेबसाईटवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शैक्षणिक वर्षाकरिता सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण दाेन हजार ६२० पात्र शाळा असून एकूण ३६ हजार ८६८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी त्वरीत अर्ज ऑनलाइन दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.