नेरळ : माथेरान या पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांना नेरळ घाटरस्त्याने सुखरूप प्रवास घडवून आणणाऱ्या नेरळ-माथेरान टॅक्सी सेवेने प्रवासी वाहतूक आज 4 सप्टेंबर पासून सुरू केली आहे.कोरोनाचे पार्श्वभूमीवर माथेरान हे पर्यटन स्थळ 17 मार्च 2020 पासून शासनाने बंद केले होते.दरम्यान, 1सप्टेंबर पासून सुरू करण्यात आले असून पर्यटन व्यवसाय सुरू होणार असल्याने टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे,पर्यटन व्यवसाय बंद असल्याने 450 टॅक्सी चालक यांची उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता.
नेरळ गावातील तरुणांनी 1985 मध्ये नेरळ-माथेरान घाटरस्त्यावरून पर्यटक प्रवाशांना माथेरान दस्तुरी नाका येथे नेण्यासाठी टॅक्सीची प्रवासी वाहतूक सुरू केली.सध्या या मार्गावर 300 प्रवासी टॅक्सी असून त्यावर 450 चालक हे काम करीत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 17 मार्च पासून माथेरान हे पर्यटन स्थळ बंद केले होते.तेंव्हापासून नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर पर्यटक यांची वाहतूक बंद झाली होती. त्या दिवसापासून टॅक्सी सेवा देखील बंद झाली असून पर्यटन व्यवसायाबरोबर टॅक्सी व्यवसाय 100 टक्के ठप्प होता.त्यावेळी टॅक्सी चालक यांना कुटुंबाची गुजराण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्याची वेळ आली होती.लॉक डाऊन काळात टॅक्सी चालक यांना रिलायन्स फाउंडेशन वगळता अन्य कोणत्याही संस्थेने मदतीचा हात पुढे केला नव्हता.त्यात गृह कर्ज आणि वाहन कर्ज यांचे हप्ते कसे फेडायचे? असा प्रश्न व्यवसाय बंद असल्याने प्रामुख्याने टॅक्सी चालक यांना पडला होता.
अखेर शासनाने माथेरान हे पर्यटन स्थळ 1सप्टेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.माथेरान हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर 3सप्टेंबर रोजी नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेची विशेष बैठक घेण्यात आली.त्यात 100 हुन अधिक टॅक्सी मालक आणि त्याहून अधिक चालक उपस्थित होते.बैठकीत सर्वांना व्यवसाय मिळाला पाहिजे यासाठी नंबर प्रमाणे टॅक्सी सुरू करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.एकाच वेळी माथेरान दस्तुरी नाका आणि नेरळ येथील प्रवासी वाहतूक सुरू करण्यावर एकमत टॅक्सीचालकांच्या बैठकीत झाले.मागील तीन दिवसात जेमतेम पर्यटक माथेरान ला पोहचले असून शनिवार आणि रविवार हे विकेंड माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला उभारी देणारे ठरणार का?याकडे माथेरान मधील हॉटेल व्यवसायीक आणि दुकानदार तसेच अश्वपाल यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पर्यटन व्यवसाय सुरू झाल्याने नेरळ-माथेरान टॅक्सी सेवा देखील सुरू करण्यात आली आहे.नेरळ रेल्वे स्टेशन येथून प्रवासी टॅक्सी सेवेचे मुख्य कार्यालय आहे.मात्र उपनगरीय लोकल सेवा सुरू झालेली नसल्याने आता टॅक्सी सेवेची सुरुवात हुतात्मा चौकातून करण्यात आली आहे.स्टेशन शिवाय हुतात्मा चौक येथून माथेरान करिता खऱ्या अर्थाने प्रवासी टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर प्रवासी टॅक्सी थांबवून ठेवण्यात आल्या असून पर्यटकांसाठी नेरळ-माथेरान टॅक्सी संघटना सज्ज आहे अशी माहिती टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पोलकम यांनी दिली आहे.