ठाणे : मागील सात ते आठ महिन्यांपासून संपूर्ण देशभरात कोरोना या आजाराने थैमान घातले. या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहे. त्यात सुरुवातीला या आजारावर कोणतेच ठोस औषध नसल्याने या आजाराबाबत नागरिकांच्या मनात प्रचंड भीती पसरली होती. तसेच या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर लस कधी येणार याची प्रतीक्षा सर्व सामान्य नागरिकांपासून सर्वांनाच लागून होती. आता, कोरोनाचा लसीची प्रतीक्षा संपली असून ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी एक लाख लसी आरोग्य उप संचालक विभागाकडे बुधवारी पहाटे प्राप्त झाल्या असून लवकरच तिन्ही जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
संपूर्ण देशाभारासह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात कोरोना या आजाराने हाहाकार उडवून दिला. त्यात या तिन्ही जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्यात बाधित रुग्णांसह या आजाराने मृत्यू होणार्यांची संख्या देखील अधिक आहे. त्यात या आजारावर लस कधी येणार याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी एक लाख 3 हजार लासी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांची लसीची प्रतीक्षा संपुष्टात आली असून दिलासा मिळाला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक 74 हजार लसी प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील 29 केंद्रांवर त्यांचे वितरीत करण्यात येणार आहेत. तर, पालघर जिल्ह्यासाठी 19 हजार 500 लसी ह्या सहा केंद्रांवर तर, रायगड जिल्ह्यासाठी 9 हजार 500 लसींचे पाच केंद्रांवर वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.