बदलापूर : काका गोळे फाउंडेशन यांच्या पुढाकाराने आणि केइएम रुग्णालयाच्या सहकार्याने रविवारी झालेल्या पाचव्या साखळी रक्तदान शिबिरात एकूण ५०० बाटल्या रक्त संकलित झाले. धनंजय विद्वांस यांना ५०० वा रक्तदात्याचा मान मिळाला. फाैंडेशनच्या माध्यमातून सतरा वर्षे रक्तदान शिबिर घेतले जात आहेत.
दरवर्षी जानेवारीमध्ये रक्तदान शिबिर घेतले जाते. गेल्यावर्षी कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा भासल्याने फाैंडेशनचे आशिष गोळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी वर्षातून एकदाच रक्तदान शिबिर न भरवता साखळी रक्तदान शिबिर भरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दर महिन्याच्या पहिल्या रविवारी शिबिर भरविण्यात येते. पहिले साखळी रक्तदान शिबिर नोव्हेंबर २०२० मध्ये पार पडले होते. रविवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत पाचवे रक्तदान शिबिर झाले. रविवारच्या शिबिरात ७० बाटल्या रक्त जमा करण्यात आले.
वर्षातून एकदा रक्तदान शिबिर भरविताना ५०० बाटल्या रक्त जमा होत होते. हे उद्दिष्ट पाचव्याच शिबिरात पूर्ण झाले असल्याने वर्षभरात साखळी रक्तदान शिबिरात हजार बाटल्या रक्त जमा करण्यात यश मिळेल असा विश्वास आशिष गोळे यांनी व्यक्त केला आहे. अर्थात बदलापूर परिसरातील रक्तदाते व कार्यकर्ते यांच्यामुळेच हे उद्दिष्ट सफल होईल.