कोरोना काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसोबतच कोकण आणि परिसरातील आंबे विक्रेत्यांचे आंबे परराज्यात जाणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत स्थानिक बाजारपेठेतच आंबा विक्री करण्याचे आव्हान प्रत्येक आंबा उत्पादक शेतकऱ्यावर होते. गेल्यावर्षीप्रमाणेच परिस्थिती यंदादेखील होती. लॉकडाउन असल्याकारणाने बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी ठेवणे अवघड जात होते. ग्राहक घरातच अडकून पडल्याने अनेक विक्रेत्यांनी आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी समाज माध्यमांवर जाहिराती करून ऑनलाईन ऑर्डर करण्याचा मार्ग अवलंबला होता. कमी किमतीत चांगला माल उपलब्ध होत असल्याने अनेक ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर करून आंबे खरेदी केले होते. यंदाच्या मोसमात चांगले आंबे, तर उत्पादकांना ग्राहकांकडून चांगला दरदेखील मिळाला आहे. आंब्याचा दर्जा चांगला असेल तर ग्राहक चांगला दर देत असल्याचे दिसून आले. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीसाठी येत असल्याने काहींनी बाजारपेठेतून आंबे खरेदी करून गोडवा चाखला. तर काही ग्राहकांनी थेट शेतातून घरापर्यंत आंबा कसा येईल यासाठी ऑनलाइन पद्धतीचा मार्ग अवलंबला.
यंदाच्या मोसमात आंबा चांगल्या प्रतीचा आल्याने आम्हाला चांगला दर मिळाला, त्यातच ग्राहक देखील समाधानी होते. त्यांच्या तक्रारी कमी होत्या. काही ग्राहक थेट आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडे येऊन आंबे खरेदी करीत होते. त्यामुळे चांगल्या आंब्याला चांगला भाव मिळाल्याचे मांजरेकर यांनी सांगितले.
ऐन मोसमात सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवता येत असल्याने ग्राहक बाजारपेठेकडे पाठ फिरवून आपल्यानजीक जेथे कुठे आंबे मिळतील तेथून आंबे खरेदी करीत असल्याने त्याचा थेट परिणाम घाऊक बाजारपेठेत झाला. अनेकांनी थेट कोकणातून आंबे मागवून घरबसल्या व्यवसाय केल्याने त्याचा थेट आंबा विक्रेत्यांवर परिणाम झाल्याचे मत आंबे विक्रेते प्रतीक किरपणे यांनी सांगितले.