कल्याण : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला शनिवारी पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. मोकाट फिरणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी हाेत आहे की नाही यासाठी पोलीस सकाळपासूनच वाहने तपासत हाेते. कल्याण रेल्वेस्थानक परिसरात टॅक्सी रिक्षाचालकांची कसून तपासणी केली. अत्यावश्यक कामासाठी बाहेर न पडलेल्या वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली. कारवाईची तीव्रता वाढता स्टेशन परिसर तासाभरात मोकळा झाला होता. सकाळी १० वाजल्यापासून कडकडीत बंदचा परिमाण दिसू लागला. मेडिकल स्टोअर, रुग्णालयात जाणारे नागरिक दिसून येत होते. पालिकेने आज आणि उद्या लसीकरण बंद ठेवले होते. पाठारे नर्सरी जवळील आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होते. लसीकरण केंद्रावर पोहाेचण्यासाठी नागरिकांनी कडकडीत उन्हात पायपीट करीत केंद्र गाठावे लागले. नाक्यानाक्यावर पोलीस तैनात होते. मोकाट फिरणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जात होती. रस्त्यावर एक दोन रिक्षाच धावताना दिसल्या. त्याही रुग्णांना घेऊन जाणाऱ्या होत्या. रस्ते मोकळे असल्याने पालिकेने जंतुनाशक फवारणीचे काम केले. परीक्षा देणाऱ्यांना प्रवासाची मुभा दिली होती. परीक्षेला जाणारे विद्यार्थी दिसून आले नाहीत. रेल्वेस्थानकातून प्रवासाला मुभा होती. रेल्वे स्टेशनवर प्रवासी तुरळक प्रमाणात हाेते. पालिका व पोलिसांकडून उद्घोषणा करणारी रिक्षा फिरवली गेली. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन या रिक्षातून केले जात होते. आजचा दिवस कडकडीत बंद पाळला गेला असला तरी उद्या मटन, मासे आणि अंडी विक्रेत्यांची दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मांसाहारावर ताव मारणारी मंडळी रविवार साजरा करण्यासाठी घराबाहेर पडण्याची शक्यता आहे.
केंद्रीय पथकाची भेट
कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक महापालिका परिसरात आले होते. डोंबिवलीतील सावळाराम कोविड रुग्णालयास पथकाने भेट देऊन पाहणी केली. या पाहणी पूर्वी पालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत चर्चा केली. कोरोना लसीकरण, टेस्टिंग, सेवा सुविधांचा आढावा घेतला. या बैठकीस पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हेही उपस्थित होते.
फाेटो- १० कल्याण-लाॅकडाऊन
------------------