ठाणे : वाईटाच्या तुलनेत देशात ४० टक्के अधिक चांगली कामेही होत आहेत; पण कान-डोळे उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले. तसेच अन्न, वस्त्र, निवाऱ्यापेक्षाही आरोग्य आणि शिक्षण महत्त्वाचे झाले असून, या दोन्ही गोष्टी आपल्या देशात अपूर्ण असल्याची खंत व्यक्त करतानाच देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. शतकपूर्ती होईल, त्यावेळी देश स्वयंपूर्ण असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ठाणे महापालिका, जितो एज्युकेशनल ॲण्ड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील बाळकूम परिसरात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमिपूजन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, आज समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीही आहेत. त्यातीलच एक चांगले काम म्हणजे ठाण्यात उभे राहत असलेले हे कॅन्सर रुग्णालय आहे.
रुग्णालयीन उपचाराचा खर्च सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचा आहे. अल्पदरात उपचार मिळावेत, ही जनतेची गरज आहे. जीव सेवा हीच शिव सेवा आहे. देशात सर्व बाबी आध्यात्मिक दुर्बिणीतून बघितल्या जातात. कॅन्सर रुग्णालय उभे राहणे म्हणजे शिव कार्य होत आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले. शासन आणि समाज दोघेही संवेदनशील आहे. त्यामुळे चांगले कार्य होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी गुजरातच्या अडलजच्या दादा भगवान फाउंडेशनचे दीपक देसाई यांनीही मार्गदर्शन केले.
संपूर्ण राज्यासाठी उपयोगी ठरणार : शिंदेठाणे जिल्हाच नव्हे तर राज्याच्या दृष्टीने हे कॅन्सर रुग्णालय उपयोगाचे ठरणार आहे. दवाबरोबर दुव्याचीही गरज असल्यामुळेच याठिकाणी रुग्णालयाबरोबर त्रिमंदिर संकुलही उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या रुग्णालयाच्या नावातच आनंद आहे. लोकांना आनंद कसा मिळेल, यासाठीच आयुष्यभर प्रयत्न केला, अशा आनंद दिघे यांच्या नावाने रुग्णालय उभे राहत असल्याचा आनंद आहे. कॅन्सर रुग्णालय हे आनंद दिघे यांचे जिवंत स्मारक ठरेल. माझी आई कॅन्सरनेच गेली. देवेंद्र फडणवीस यांचे वडीलही याच आजाराने ग्रस्त होते. कॅन्सर कोणालाच होऊ नये, अशी भावना असते, असे ते म्हणाले.
जीडीपीत जैन समाजाचा वाटा : फडणवीसउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आनंद दिघे यांचे कार्य खूप मोठे आहे. ते ठाणे जिल्ह्याच्या अत्यंत दुर्गम भागात काम करायचे. तेव्हा त्यांच्या रुग्णवाहिकामुळे अनेकांचे प्राण वाचले. त्यांची परंपरा एकनाथ शिंदे चालवत आहेत. तसेच ज्यांच्या पाठी जैन समाज आणि जितो असतात, त्यांना संसाधनाची कोणतीही कमी नसते. आज देशाचा जीडीपी वाढवण्यात जैन समाजाचा मोठा वाटा आहे. या समाजातील व्यक्ती नुसते पैसे कमवत नाही, तर लोकांची सेवा पण करतात.