लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शासनाने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. लग्न सोहळ्यांवरदेखील नियमांचे बंधन आले आहे. या नियमांमुळे काहींनी आपला विवाह सोहळा पुढे ढकलला आहे, तर काहीजणांनी या नियम आणि अटींच्या चौकटीत विवाह सोहळे करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ठरलेले लग्नसोहळे पुन्हा लांबणार, असे वाटत असतानाच काही अटींच्याआधारे लग्नांना परवानगी देण्यात आली आहे. कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करावे लागत असल्याने काहींनी नोंदणी पद्धतीनेदेखील विवाह करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
-----------------------------
लग्नासाठी वधू-वरांच्या कुटुंबाला परवानगीसाठी फार धावपळ करावी लागत नाही. जे पाहुणे येणार आहेत त्यांची यादी पोलीस स्टेशनला तसेच, हॉल व्यवस्थापकाला द्यावी लागते किंवा हॉल मालकाला दिल्यावर ते पोलिसांना देतात, असे कुटुंबीयांनी सांगितले.
-----------------------------
लग्न सोहळ्यासाठी शहरात हॉलमध्ये केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचे तसेच, सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे तसेच, गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचित केले आहे.
-----------------------------
जुलै महिन्यात विवाहासाठी ०१, ०२, ०३ आणि १३ जुलै हे शुभ मुहूर्त आहेत. परंतु, ज्यांना हॉल मिळत नाही, अशांसाठी काढीव गौण मुहूर्तदेखील काढले आहेत. आषाढी एकादशीनंतर चातुर्मासातही मुहूर्त दिले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. २२, २५, २६, २८ आणि २९ जुलै हे काढीव मुहूर्त आहेत.
------------------------------
कमी लोकांमध्ये लग्न करायचे म्हटले, तर धावपळ सुरू आहे. कारण कोणाला बोलवायचे आणि कोणाला टाळायचे, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. कोणाचे मन न दुखवता आमंत्रणे टाळायची आहेत आणि हा मोठा पेचप्रसंग समोर आहे. सध्या आम्ही द्विधा मन:स्थितीत आहोत.
- बन्सी बारावकर, वरपिता
------------------------------
५० लोकांमध्ये विवाह करणे म्हणजे अनेक नातेवाईकांची मन दुखावणे आहे. त्यामुळे निर्बंध उठल्यावरच आम्ही विवाह सोहळ्याचा मुहूर्त ठरवू आणि त्याचदिवशी शुभमंगल सावधान करू, अशी भूमिका काही कुटुंबांनी घेतली आहे.