ठाणे : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनकरिता रविवारी पार्टी लूकच्या मूडमध्ये तरुणाई आहे. स्वत: आकर्षक आणि उठावदार दिसण्यासाठी ब्युटी पार्लर्स, हेअर सलॉनकडे तरुणाईची पावले वळली आहेत.यंदा हेअर स्टाइल आणि हेअर कलरिंगवर तरुणाईचा अधिक भर असून त्यासाठी खिसा खाली करण्याची तयारी तरुण मंडळींनी दाखवली आहे. हेअर स्टायलिस्ट आणि ब्युटीशियन्सच्या तारखा १५ दिवसांपासून बुक झाल्या आहेत.३१ डिसेंबर अवघ्या तीन दिवसांवर आहे. सेलिब्रेशनचा फीव्हर चढू लागला आहे. या दिवशी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. पार्टीत चारचौघांमध्ये आपण उठून दिसावे, यासाठी तरुणतरुणी तयारीला लागले आहेत. यंदा फेसपेक्षा हेअर स्टाइलवर अधिक भर दिला जात असल्याचे निरीक्षण हेअर स्टायलिस्टने नोंदवले आहे. महागतल्या महाग हेअर स्टाइल करण्याकडे त्यांचा कल आहे, असे हेअर स्टायलिस्टकडून सांगण्यात आले.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हॉटेल, पब्स, हुक्का पार्लर सज्ज झाले आहेत. ‘लेट्स डू पार्टी टू नाइट’ हा फीव्हर ठाण्यात चढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी रोषणाई, साजवट केल्याचेही दिसत आहे. महिना-दोन महिने आधीपासूनच पार्टीचे प्लानिंग, जागा बुकिंग झाले आहे. त्यातच रविवारी सेलिब्रेशन असल्याने सुटीचा प्रॉब्लेम नाही. पार्टीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी स्वत:ला नटवण्याथटवण्यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच ब्युटी पार्लर्स, हेअर सलॉन गर्दीने खच्च भरणार आहेत. आकर्षक हेअर स्टाइल करण्याचा तरुण मंडळीचा मूड आहे.हेअर स्टाइलचे दर ८०० रुपयांपासून अगदी दोन हजार रुपयांपर्यंत तर कलरिंगचे दर आठ हजारांपासून १५ हजारांपर्यंत आहेत. हेअर स्टाइलसाठी २५ डिसेंबरच्या आधीपासून तरुणींनी ब्युटी पार्लर्समध्ये चकरा मारायला सुरुवात केली असल्याचे ब्युटीशियन कस्तुरी लोहार यांनी सांगितले. यात स्मुदनिंग, आयर्निंग, हेअर स्पा, हायलाइट्स, हेअर स्पा करण्यावर भर असल्याचे त्या म्हणाल्या. खिशाला कात्री बसली तरी चालेल, पण महागडा हेअर कलर आणि हेअर स्टाइल करण्याच्या मूडमध्ये तरुणाई आहे.>शॉर्ट हेअरची तरुणींमध्ये तर तरुणांमध्ये स्लीक्ड बॅक, पम्पायर्ड (त्यातही क्लासिक), क्रीव कट विथ लाइन या हेअर स्टाइलची क्रेझ आहे, असे हेअर स्टायलिस्ट रुशील मोरे यांनी सांगितले. हेअर स्टाइलसोबत हेअर कलरिंगची तुफान क्रेझ तरुणाईत यंदा दिसून येत आहे. त्यात बलयाज, टॉफी लाइट, प्लम रिच या कलर्सला अधिक पसंती दिली जात असल्याचे रुशील यांनी सांगितले.
#GoodBye2017 : थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनचे रंग उतरले केसांतही...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:15 AM