लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेले काही दिवस विक्रमी पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील बहुतांशी गावागावात जनतेचे अन्नधान्यापासून आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचे हे वास्तव लक्षात घेऊन ठाणे व मुंबई येथील महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिकारी - कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन या विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अन्नधान्य व साहित्याचे किट व विविध वस्तू जिल्ह्यातील चेरीव या गावातील या पूरग्रस्थाना टेम्पोद्वारे रवाना केल्या आहेत.
येथील जिल्हा कोषागार कार्यालयातून हा अन्नधान्य, साहित्य पुरवठा शनिवारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 'चेरीव' या गावात पोहोचवून त्यांची मायेने विचारपूस केली. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याचे या मदतीचा हातभार सक्रीय सहभागातून करण्यात आला. यासाठी सर्वांनी आपापल्या परीने हातभार लावला आहे. या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून 'चेरीव' या गावात अन्नधान्याचे एक किट याप्रमाणे एकूण ५२ बाधित कुटूंबाना मदत केली आहे. या किटमध्ये तांदूळ दहा किलो, पीठ दहा किलो, एक किलो गहू, तूरडाळ, दोन किलो, साखर- एक किलो, चहा पावडर अर्धा किलो, एक पाव हळद, मसाला अर्धा किलो, मीठ एक किलो, गोडेतेल, मास्क, फिनेल बाटली आणि साबण वडी आदी साहित्य व अन्नधान्य वाटप केले आहे. यासाठी या अधिकारी, कर्मचारी संघटनेचे दिपेश तांडेल, राजश्री सावंत, राहूल जाधव आदींनी परिश्रम घेतले.