मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने शांती नगर मैदानात पालिकेने बांधलेले समाज मंदिर हे कलावती आईंची उपासना करणाऱ्या सिद्धकला भजन मंडळास दिले असताना पालिकेनेच त्यातील सामान परस्पर काढून नेत भूखंड खाजगी व्यक्तीला मोकळा करून देण्यासाठी समाज मंदिरच जमीनदोस्त केल्याचा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल सावंत , गटनेता जुबेर इनामदार , जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेविका मर्लिन डिसा , गीता परदेशी, नगरसेवक अशरफ शेख आदींनी पत्रकार परिषदेत महापालिका आणि सत्ताधारी भाजपावर या प्रकरणी आरोप केले आहेत. मीरारोडच्या शांती नगर सेक्टर ९, सर्वे क्रमांक २०६ मधील मैदान हे विकासक शांतीस्टार बिल्डरच्या बांधकाम मंजुरीत आरजी भूखंड दाखवला आहे . विकासकाने सदर जागेचा फायदा घेतला आहे . सदर आरजी विकासकाने पालिकेस देखभालीसाठी दिले होते . पालिकेने मैदान विकसित करण्यासह सदर ठिकाणी समाज मंदिर बांधले. तसेच अन्य कामे केली.
२०१४ साली सिद्धकला भजनी मंडळ ह्या महिलांच्या संस्थेस समाज मंदिर ५ वर्षांच्या कराराने भाड्याने पालिकेने दिले . दरम्यान सदर जागेची मालकी हि पेणकरपाड्यातील पाटील कुटुंबीयांची सिद्ध झाल्याने त्यांनी सदर जागे भोवती आपले कुंपण टाकून जागा ताब्यात घेतली . पाटील कुटुंबीयांनी अनेकवर्ष संघर्ष करून स्वतःचा हक्क मिळवला , तर जमीन मालकीचा वाद निर्माण झाला असताना महापालिकेने विकासकाला आरजी जागेचा दिलेला फायदा सुद्धा रद्द केला नाही. ३१ मे रोजी मंडळाची मुदत संपलेली असल्याने त्यांनी मुदतवाढ मागितली . परंतु पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी टाळे असताना समाज मंदिरातील मंडळाचे सामान काढून गाडीत भरून घेऊन गेले . त्या नंतर सदर समाज मंदिराचे बांधकाम पाडून टाकण्यात आले .
ह्या प्रकरणी पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित , कनिष्ठ अभियंता सचिन पाटील , नगररचना अधिकारी आदींवर कारवाई करा. विकासकाला मोबदला दिलेला असताना तसेच पालिकेचा कब्जा असताना खाजगी लोकांना कब्जा कसा घेऊ दिला ? समाज मंदिरच्या बांधकाम साठी पालिकेने करदात्या जनतेचे पैसे खर्च केले असताना त्याचे नुकसान केल्याचा आरोप काँग्रेसच्या सावंत , सामंत आदींनी केला आहे .