लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ‘गुडविन ज्वेलर्स’चे व्यवस्थापकीय संचालक तसेच या फसवणुकीतील मुख्य आरोपी सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोन्ही भावांच्या पोलीस कोठडीमध्ये ठाणे न्यायालयाने आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्यानंतर ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या मागणीनंतर ही वाढ करण्यात आली आहे.ठाण्यातील नौपाडा, डोंबिवलीतील विष्णुनगर आणि अंबरनाथमधील शिवाजीनगर या तीन पोलीस ठाण्यांमध्ये ‘गुडविन ज्वेलर्स’ ने केलेल्या फसवणुकीची तक्रार दाखल होण्यापूर्वीच अकराकरण बंधू पसार झाले होते. २६ आॅक्टोबर २०१९ रोजी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ते १३ डिसेंबर २०१९ रोजी ठाणे न्यायालयात ते शरण आले होते. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यावर २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते.*केरळ मध्ये आणखी पाच एकर जमीन आढळलीठाणे शहर व्यतिरिक्त राज्यातील ठाणे ग्रामीणमधील नयानगर, पुणे, पिंपरी चिंचवड, चेंबूर, वाशी, पालघर आणि वसई आदी ठिकाणीही गुडविन ज्वेलर्सने अशाच प्रकारे जादा परताव्याचे तसेच सोन्याचे दागिने देण्याचे प्रलोभन दाखवून अनेकांची फसवणूक केली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सुमारे १२०० गुंतवणूकदारांची त्यांनी २५ कोटीपेक्षा अधिक फसवणूक केली आहे. त्यांची केरळ, हैद्राबादसह डोंबिवलीतील २६ मालमत्ता ठाणे पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आणखी एक मालमत्ता तसेच त्यांची केरळमध्ये पाच एकर जमीनही आढळली आहे. याशिवाय, त्यांनी फसवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या तक्रारीही रोज दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोपींना दिलेल्या पोलीस कोठडीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी चांगली माहिती काढून मालमत्ता जप्त केली आहे. आणखी पुढील तपासासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी आर्थिक गुन्हे शाखेने २४ डिसेंबर रोजी ठाणे न्यायालयात केली. ही मागणी मान्य करूनन्यायालयाने अकराकरण बंधूंच्या कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.