ठाणे : अॉनलाईन शिक्षण व्यवस्थापन प्रणाली वृद्धिंगत करण्याच्या हेतूने गुगल क्लासरूमची निर्मिती करण्यात आली. या टूलच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थी अभ्यासघटकांसंदर्भात सहजपणे अॉनलाईन संवाद साधू शकतात, शिक्षणविषयक माहितीचे आदान-प्रदान करू शकतात, असे मत दिल्ली विद्यापिठाच्या रामनुजन महाविद्यालयातील प्रा.भाव्या आहुजा-ग्रोव्हर यांनी मांडले.
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे आणि मुंबई विद्यापिठाच्या वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 'ई-लर्निंग : ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडब्रँड.' ह्या वेबिनारच्या सहाव्या रविवारी पहिल्या सत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंविषयी सद्भावना व्यक्त केल्या. दुसऱ्या सत्रात प्रा.भाव्या यांनी `एक्सप्लोर द गुगल अँड गुगल क्लासरूम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुगल क्लासरूममधील स्ट्रीम, क्लासवर्क, पीपल हे घटक प्रात्यक्षिकांसह विस्ताराने त्यांनी समजावून सांगितले. अभ्यासघटकाशी निगडीत शिक्षकांनी पाठवलेली माहिती, नोटस्, दुवे, या बाबी कशा पाहाव्यात, शिक्षकांनी सरावासाठी पाठवलेले स्वाध्याय, प्रश्नोत्तरी सोडवून सबमिट कसे करावे यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. स्वाध्याय सोडवण्यासाठी गुगल क्लासरूम अंतर्गत उपलब्ध असलेल्या गुगल डॉक्स, स्लाईडस्, शीटस्, ड्रॉइंगस् या घटकांचा प्रभावी उपयोग कसा करावा, हे प्रात्याक्षिकांच्या साहाय्याने भाव्या यांनी सांगितले. गुगल डॉक्सवर व्हाईस टायपिंगच्या मदतीने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लेखन करता येते, स्लाईडच्या साहाय्याने उत्तम सादरीकरण करता येते, गुगल शीटस् चा उपयोग एम.एस.एक्सेलप्रमाणे करता येतो, असे त्या म्हणाल्या. गुगल क्लासरूमच्या साहाय्याने शिक्षकांनी दिलेले गुण, ग्रेडस् कसे पाहावे, आपल्या शंका शिक्षकांना वैयक्तिकरित्या कशा विचाराव्या अशा अनेक बाबी भाव्या यांनी समजावून सांगितल्या. याबरोबरच `गुगल जॕमबोर्ड` या शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त टूलची भाव्या यांनी सविस्तरपणे ओळख करून दिली. जॕमबोर्डवर स्टीकीनोटस्च्या साहाय्याने लेबल्स कसे तयार करावेत, नवीन फ्रेम कशी तयार करावी हे प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने समजावून सांगितले. अॉनलाईन शिक्षण व्यवस्थापन प्रणाली वृद्धिंगत करण्याच्या हेतूने गुगल क्लासरूमची निर्मिती करण्यात आली. या टूलच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थी अभ्यासघटकांसंदर्भात सहजपणे अॉनलाईन संवाद साधू शकतात,शिक्षणविषयक माहितीचे आदान-प्रदान करू शकतात, असे त्या म्हणाल्या. व्याख्यानानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना उदभवणाऱ्या शंका ऐकून त्यांचे शंकानिरसन केले. आजच्या कार्यक्रमाची सूत्रे पूर्णपणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांभाळली.