ठाणे : वाचनालय हे ज्ञानमंदिर आहे आणि ते पुढेही राहणार. वाचाल तर वाचाल ही जुनी म्हण आहे पण आता ही म्हण गांभीर्याने विचारात घेतली जात नाही. कारण आपल्यात बदल झाला आहे. आपली जाहा ही मोबाईलने घेतली आहे. आपल्याला काही हवे असेल तर आपण गुगलवर शोध घेतो. गुगलने माणसाचा संयम संपवला आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनालयात जाऊन पुस्तके वाचावीत. दुर्दैवाने आपण पुस्तकापासून दूर जात आहोत अशी खंत ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली.
मोबाईलमुळे आपल्या झोपेवर परिणाम होऊ लागला आहे. आपली झोप कमी झाली आहे. जी गोष्ट होणार नाही त्याची आपण काळजी करत असतो. ताणतणावामुळे झोपेचा कालावधी कमी झाला आहे. मेंदूच्या पेशी दिवसभरात दररोज वापरल्या जातात त्या झोपेतच रिकव्हर होतता. निद्रानाशमुळे लोकांना अल्झायमरसारखे आजार होऊ लागले आहेत. लोक विसरतात कारण त्यांना पुरेशी झोपच मिळत नाही. पुस्तक एक तास वाचले तरी गाढ झोप लागते. झोपून पुस्तक वाचून नको, बसूनच ते वाचले पाहिजे असा सल्ला डॉ. लहाने यांनी दिला. ५ टक्के मेंदूचा कॅन्सर हा मोबाईलमुळे तसेच छातीवर मोबाईल ठेवल्यामुळे हृदयाचे आजार होत असल्याचे वास्तव त्यांनी समोर मांडले.
व्हॉट्सॲपवर येणाऱ्या माहीतीची शहानिशा करण्याचा मोलाचा कानमंत्र त्यांनी उपस्थितांना दिला. सहा वर्षापर्यंतच्या मुलाच्या हाता मोबाईल देणे घातक त्यामुळे त्याचा आयक्यू कमी होतो. मोबाईलचा कमीत कमी वापर केला आणि वाचनालयात जास्त वेळ घालवला तर मोबाईलमुळे होणारे आजार नक्कीच टाळता येतात. एकंदरीत सर्वांनीच वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असे त्यांनी शेवटी नमूद केले.
ठाणे नगर वाचन मंदिर या संस्थेचे यंदा शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शनिवारी सुप्रसिद्ध नेत्र तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षातील उपक्रमांचा शुभारंभ झाला. यावेळी संस्थाध्यक्ष केदार जोशी, कार्यवाह हेमंत दिवेकर, मोहिनी वैद्य, वीणा परब आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्यगीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका प्रणाली नवघरे यांनी तर दिवेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.