ठाणे : हगणदारीमुक्त ठाणे करण्यासाठी पालिकेने आता थेट गुगलची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, शहरातील तब्बल ११ हजार २१७ सार्वजनिक शौचालयांची माहिती आता गुगलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उघड्यावर शौच करण्याऐवजी ठाणेकरांनी गुगलची मदत घेऊन सार्वजनिक शौचालयांचा लाभ घ्यावा, हा या मागचा मूळ उद्देश असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.एखाद्या गावाची, दिग्गज नेत्याची माहिती किंवा हॉटेल, मॉल, सिनेमागृह आदींसह इतर माहिती देण्यासाठी प्रचलित असलेले गुगल आता शहरातील सार्वजनिक शौचालयांची माहितीदेखील उपलब्ध करून देणार आहे. केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता ठाण्यातील सर्व सार्वजनिक शौचालये ही गुगलवर दिसणार आहेत. ठाणे महापालिकांतर्गत येणाºया ११ हजार २१७ सार्वजनिक शौचालयांना आता टॉयलेट लोकेटरद्वारे गुगलवर टाकले जाणार आहे. यासाठी क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या (क्यूसीआय) माध्यमातून संपूर्ण खर्च केला जाणार आहे.शहरातील सार्वजनिक शौचालये गुगल मॅपद्वारे टॉयलेट लोकेटर बसवण्यासाठी १ कोटी ९८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच ही सेवा सुरू केल्यानंतर यामध्ये ५ पेक्षा जास्त त्रुटी आढळून आल्यास पुन्हा त्यात सुधारणा करण्यासाठी ६० हजारांचा खर्च येणार आहे. असा एकूण २ कोटी ५८ लाखांवर जाणार आहे. त्यावर नवीन करप्रणालीनुसार १८ टक्के जीएसटी लागणार असल्याने त्यात आणखी वाढ होऊन तो ३ कोटी ४ लाख ४४० रुपये एवढा होणार आहे. या खर्चापैकी ८० टक्के रक्कम कार्यादेश दिल्यानंतर आगाऊ देण्यात येणार असून उर्वरित २० टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यावर दिली जाणार आहे. त्यानुसार, आता येत्या २ आॅक्टोबरपर्यंत ही शौचालये गुगल मॅपला जोडली जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.
गुगल दाखवणार सार्वजनिक शौचालये, ११ हजार २१७ सार्वजनिक शौचालयांची माहिती आता गुगलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 3:11 AM