डोंबिवली : बंजारा समाज हा कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यांमध्ये विखुरलेला आहे. परंतु तरीही या समाजाची भाषा आणि पेहराव एक आहे. या समाजातील साहित्य आणि संस्कृती ही मौखिक साहित्याच्या आधारांवर टिकून आहे. देशात सात कोटी बंजारा समाजबांधव आहेत. त्यामुळे या भाषेला संविधानात्मक दर्जा मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा प्रख्यात साहित्यिक व संमेलनाध्यक्ष मोहन नाईक यांनी व्यक्त केली.आॅल इंडिया भारतीय बंजारा सेवा संघाने येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात पाचवे अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन भरवले आहे. त्याचे उद्घाटन गुरुवारी आमदार व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी नाईक बोलत होते.नाईक पुढे म्हणाले, भारतीय राज्यघटनेच्या संविधानात गोरबंजारा बोलीभाषेसाठी घटनात्मक दुरुस्ती झाली पाहिजे. या समाजाच्या इतिहास लोप पावत आहे. या समाजाचे अस्तित्व टिकावे, यासाठी साहित्य प्रगल्भ झाले पाहिजे. बंजारा समाजाची संस्कृती ही जागतिक दर्जाची संस्कृती आहे. ही संस्कृ ती लोप पावू नये. शब्दांची वारंवार उत्क्रांती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.वास्तववाद, स्वच्छंदतावाद, अभिजातवाद यांची तंड्यातून निर्मिती झाली आहे. बौद्धिक चळवळ म्हणून ही गणली जाते. या संस्कृतीत मानवतावाद, बंधुत्व दिसून येतो. संस्कृतीत समानता दिसून येते. स्वतंत्र भारतात बंजारा समाज उपेक्षित आहे. राज्यघटनेनुसार त्यांना हक्क मिळालेला नाही. बिटिश काळात या समाजाचा मुख्य व्यवसाय रसद पुरवणे हा होता. मात्र, पुढे हा व्यवसाय ठप्प झाला. हा समाज कष्टकारी असून, तो केवळ जंगलात आणि तांड्यात राहतो. या समाजाचे साहित्य हे मौखिक परंपरेतून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आहे. पण या समाजातील महिलाही लेखणीचा वापर करतील. हा समाज शोषणमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी गणेश मंदिरापासून सावित्रीबाई फुले कलामंदिरापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. त्यात समाजबांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
समाजाच्या उत्थानासाठी एकत्र : देशातील विविध भागांतून गोरबंजारा समाजबांधव या संमेलनासाठी आले आहेत. समाजाची संस्कृती, परंपरा यांचे संवर्धन करणे हा या साहित्य संमेलनामागील उद्देश आहे. गोरबंजारा बोलीभाषा टिकली पाहिजे. समाजातील मुलांना शिक्षण आणि आरक्षणाचा लाभ सरकारकडून मिळायला हवा. समाजाच्या उत्थानासाठी काय केले पाहिजे आदी विषयांवर या दोन दिवसीय संमेलनात चर्चा होणार आहे.