मीरा रोड : गावाला जाण्यास निघालेल्या दाम्पत्याची रिक्षात राहिलेली दागिने आदी दोन लाखांचा ऐवज असलेली सामानाची बॅग नवघर पोलिसांनी अवघ्या एका दिवसात शोधून परत केली. सीसीटीव्हीची यासाठी मोठी मदत झाली. तर, सापडलेली बॅग बळकावणाऱ्या अप्रामाणिक रिक्षाचालकाविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
भार्इंदर पश्चिमेच्या पोलीस ठाण्याजवळील गोपीनाथ स्मृतीमध्ये राहणारे कैलाश नागरे ( ३३) हे पत्नीसह गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास भार्इंदरहून रिक्षा पकडून बोरिवलीला जाण्यास निघाले होते. दिवाळीनिमित्त बुलडाण्यामधील मूळ गावी खाजगी बसने ते जाणार होते. बोरिवलीला पोहोचायला त्यांना उशीर झाल्याने रिक्षा तशीच पुढे महामार्गावर नेऊन वाटेतच त्यांनी बस पकडली. रिक्षातून घाईगडबडीत उतरून त्यांनी बस पकडली. परंतु, बसमध्ये बसल्यावर त्यांच्या लक्षात आले की, सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग रिक्षातच विसरली. नागरे दाम्पत्य गावाला जायचे सोडून बसमधून उतरले व ज्या ठिकाणी रिक्षाचालकाने सोडले होते, तेथे पोहोचले. परंतु, बराच वेळ रिक्षाचालक परत न आल्याने समतानगर पोलीस ठाण्यात त्यांनी बॅग हरवल्याची तक्रार नोंदवली व भार्इंदरला घरी परत आले.शुक्रवारी नागरे दाम्पत्याने भार्इंदर पोलीस ठाण्यामागील सहायक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कार्यालयात भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. कुलकर्णी यांनी निरीक्षक राम भालसिंग यांना तपासाच्या सूचना दिल्या.सीसीटीव्ही फुटेजचा झाला फायदापोलिसांनी नागरे दाम्पत्य जेथून रिक्षात बसले होते, त्यापासून दहिसर चेकनाकयापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना त्या रिक्षाचा क्रमांक सापडला. त्यानंतर, ही रिक्षा कोणाची व कुठली आहे, हे पोलिसांनी शोधून काढले.रिक्षाचालक सुरेंद्र यादव हा भार्इंदरच्याच गोडदेवनाक्याजवळील ताजमहल इमारतीत राहणारा असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला आधी नागरे दाम्पत्याची दागिन्यांची बॅग परत करण्यास सांगितले. परंतु, यादव हा बॅग सापडलीच नाही, असे सांगून टोलवाटोलवी करू लागला. शेवटी, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच यादवने दागिने असलेली बॅग आणून दिली. पोलिसांनी ती बॅग नागरे दाम्पत्यास स्वाधीन केली.