मीरारोड - राज्य शासनाच्या भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका व कर्मचाऱ्यांना तब्बल ३ महिन्यांचा पगार मिळालेला नाही . त्यातच शुक्रवार पासून अनेक परिचारिका , कर्मचारी कामावर न आल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे . कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ह्या अघोषित बंद ला आरोग्य विभागचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून कंत्राट मार्च मध्ये संपलेले असताना त्याला अजून मुदतवाढ दिलेली नाही .
भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने गरीब , गरजू रुग्ण उपचारासाठी येत असतात . रुग्णालयात परिचारिका , वॉर्ड बॉय , तंत्रज्ञ, शिपाई , वाहन चालक आदी सुमारे १४० कंत्राटी कर्मचारी आहेत . फोकस फॅसिलिटी ह्या ठेकेदार मार्फत कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले असून त्याचे कंत्राट मार्च २०२३ मध्येच संपलेले आहे . शासनाच्या आरोग्य विभागा कडून ठेकेदारास मुदतवाढ मंजूर करण्यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काम करून देखील एप्रिल , मे , जुन ह्या तीन महिन्याचा पगार काढलेला नाही . त्यामुळे कर्मचारी देखील तीन महिन्या पासून पगारा विना काम करत आहेत .
घरचा खर्च चालवणे अवघड झाले असतानाच मुलांच्या जून मध्ये सुरु झालेल्या शाळा - शिक्षणाचा खर्च आदी भागवणे ह्या बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने त्रासदायक झाले आहे . लांबून येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना तर प्रवासाचा खर्च सुद्धा जमत नाही . परंतु नोकरी जाऊ नये म्हणून पोटाला चिमटा काढून हे कंत्राटी कर्मचारी काम करत आले .
मात्र शुक्रवार पासून अनेक परिचारिका व कर्मचारी हे कामावर आलेच नाहीत . त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली आहे . जेणे करून रुग्णांचे हाल होत आहेत . कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे .
श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी सांगितले कि , ठेकेदारास मुदतवाढ व कंत्राटी कामगारांना वेळेत पगार देण्या बाबत आपण ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांना लेखी पत्र देऊन चर्चा देखील केली . परंतु कंत्राटी कर्मचारी आदींचे पगार दोन - तीन महिने राखडवणे हे नेहमीचे झाले असून या प्रकरणी वेळीच कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा व कमर्चाऱ्यांना वेळेत पगार द्या अशी मागणी केली आहे .