मीरा रोड : ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जुन्या व धोकादायक इमारतींचा विकास ‘क्लस्टर’ योजने अंतर्गत करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने महापालिकेकडून मागवला असल्याची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दिली. यामुळे शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होऊन हजारो कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले.
शहरात मोठ्या प्रमाणात धोकादायक, जुन्या इमारती आहेत. परंतु, जमिनीच्या मालकी हक्कापासून वाढीव प्रमाणात झालेले बांधकाम आणि विकास नियंत्रण नियमावलीतले नियम आदी अनेक कारणांनी शेकडो इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. अनेक धोकादायक इमारती मोडकळीस आल्या असून, रहिवासी जीव मुठीत धरून जगत आहेत. इमारत कोसळून अनेकांचे जीव गेले आहेत. अशा इमारतींत राहणारे हजारो कुटुंबीय हक्काच्या घरापासून वंचित आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण सतत पाठपुरावा करूनसुद्धा त्यांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या ह्या पुनर्विकासाच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाबाबत दुर्लक्ष केले. आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर मीरा-भाईंदरसाठी अनेक योजना व विकासकामे मार्गी लावण्याचे काम होत असल्याचे ते म्हणाले.
ग्रामपंचायत काळात कुठलेही बांधकाम नकाशे मंजूर न करता अतिशय दाटीवाटीने या इमारती बांधलेल्या आहेत. त्यामुळे समूह विकास (क्लस्टर) योजनेशिवाय या जुन्या इमारती विकसित होऊ शकत नाहीत. त्यातच शहराच्या तिन्ही बाजूला खाडी व समुद्रकिनारा असल्याने या शहरातील जमीन इतर शहरातील जमिनीपेक्षा दलदलीची असल्याचे आ. सरनाईक म्हणाले.
विधानसभा अधिवेशनातसुद्धा क्लस्टर योजना लागू करावी यासाठी आग्रही मागणी केली होती. त्यावर ठाण्यात ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर एमएमआर क्षेत्रातील इतर महानगरपालिकांमध्ये ती कार्यान्वित केली जाईल, असे आश्वासन शासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले.