ठाणे : कोरोना या महामारीतसुद्धा जीवाची पर्वा न करता योद्धा म्हणून लढा देणाºया सरकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांची, कामगारांची कुचंबणा, आर्थिक गळचेपी केंद्र व राज्य शासनाच्या विविध धोरणांद्वारे होत असल्याचा आरोप करून याविरोधात मंगळवारी ‘राष्ट्रीय विरोध दिवस’ जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह ठाणे जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयाच्या कर्मचाºयांनी पाळून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध केला.
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली कर्मचाºयांनी हे आंदोलन केल्याचे संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी सांगितले. या आंदोलनाचे औचित्य साधून जुनी पेन्शन योजना लागू करावी, बदली, कंत्राटी तथा मानधनावरील कर्मचाºयांना सेवेत नियमित करावे, रिक्त पदे तत्काळ भरावीत, या भरतीत अनुकंपाधारकांना प्राधान्य देण्यात यावे, कोविड योद्ध्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी वैयक्तिक सुरक्षा उपकरणे, रबरी हातमोजे, नाकाला आणि तोंडाला मास्क, डोक्याला प्लास्टिक कव्हर, रबराचे बूट, चष्मा, आणि फेस शील्ड यांचा त्वरित पुरवठा करावा. त्यांना विमा मुदतवाढ देण्यात यावी. तसेच कोरोनाशी लढणाºया सर्व आरोग्य सेवेतील कर्मचाºयांचा क्वारंटाइन कालावधी राज्यभर एकसारखाच असावा, त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्थाही करावी या मागण्याही या वेळी करण्यातआल्या.