- रवींद्र साळवेमोखाडा : जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील वंदना बुधर या आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून आरोग्य आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला, तर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन मदतीचा हात दिला आहे. दरम्यान, ऐन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गंभीरतेने दखल घेतली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना, सरकार आणि आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात घडली. मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील वंदना या आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर वंदनाला प्रचंड रक्तस्राव झाल्याने दवाखान्यात नेताना रस्त्याअभावी मुसळधार पावसात डोलीतून तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले होते.
मरकटवाडी येथे जाण्यासाठी अर्थसंकल्पीय कामांमध्ये एक किलोमीटर कामास मंजुरी दिली होती, मात्र राज्यात सत्तांतर झाल्यामुळे कामांना स्थगिती देण्यात आल्यामुळे काम रखडले आहे. याचा फटका स्थानिकांना बसत असून त्यांच्या जीवावर बेतत आहे.