सदानंद नाईक -
उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्क व दंडावरील रकमेवर सवलत व माफी देण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे. तसेच मुद्रांक शुल्क भरण्यासाठी सबरजिस्टर कार्यालयात एक खिडकी सुविधा सुरू केल्याची माहिती महापालिका सहायक संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्क व दंडावरील रकमेवर सवलत व माफी देण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे. त्यानुसार उल्हासनगर मधील इमारतीच्या सोसायटी रजिस्टर करणाऱ्या आणि विविध लाभ घेण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक संचालक नगररचना ललित खोब्रागडे यांनी अधिकारी व नागरीक यांची कार्यशाळा गेल्या महिन्यांत आयोजित केली होती. कार्यशाळेत नागरिकांनी केलेल्या विनंतीनुसार नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार तहसील कार्यालय जवळील सबरजिस्ट्रार कार्यालयात एक खिडकी सुविधा सुरू केली. शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन आपले अर्ज सदर ठिकाणी सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अजीज शेख व सहायक संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे यांनी केले आहे.