उल्हासनगर : केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांचा एका छताखाली लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी महापालिकेने शासन आपल्या दारी उपक्रमाचे उदघाटन महापालिका शाळा क्र. २३ मध्ये आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते मंगळवारी झाले.
उल्हासनगर महापालिकेने डीप स्वच्छता मोहीम, विकास कामाचा आढावा आदी उपक्रम सुरु केले. त्यापाठोपाठ पर्यावरण जनजागृतीसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. शासन आपल्या दारी या कार्यक्रमातंर्गत शासनामार्फत राबविण्यात येत असलेले आभा कार्ड नोंदणी, आधार कार्ड, प्रधानमंत्री मातृत्व वंदना, दिव्यांग योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, पंतप्रधान स्वनिधी, वन नेशन वन रेशनकार्ड, जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणी व इतर अशा विविध योजनांबाबत माहिती व लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी दुपारी आमदार कुमार आयलानी, महापालिका आयुक्त अजीज शेख, शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, माजी नगरसेविका ज्योती गायकवाड, दिलीप गायकवाड, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष, ठाणे जिल्हा समन्वयक पवन गोसावी, उप-आयुक्त डॉ. सुभाष जाधव, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, संगीता लहाने आदीजन उपस्थित होते. महापालिका कार्यक्षेत्रातील विविध पॅनल मध्ये २३ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.