ठाणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने ठाण्यातील विविध रस्त्यांची डागडुजी करण्याबरोबर नवीन प्रशस्त रस्ते करण्यासाठी तब्बल २१४ कोटींच्या निधीला मंजुरी दिली. यामध्ये काही रस्त्यांचे डांबरीकरण, काही रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. शहरातील विविध प्रमुख चौकांच्या सुशोभीकरणासाठी १२० कोटींच्या आसपासचा निधी मंजूर झाला.
दरवर्षी महापालिका हद्दीत पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडतात. रस्त्यांच्या गुणवेत्तवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होते. खड्ड्यांमुळे ठाणेकरांचे हाल होतात. त्यामुळे रस्त्यांच्या एकत्रित विकास कार्यक्रमाकरिता स्थायी समितीचे माजी सभापती राम रेपाळे यांनी महासभेत ठराव केला होता. अखेर रस्त्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने २१४ कोटींचा निधी मंजूर केला. शहरातील दुरुस्ती केल्या जाणाऱ्या रस्त्यांची जम्बो यादी पालिका तयार करीत आहे.
या यादीत वरचे स्थान घोडबंदर रोड भागातील २३ रस्त्यांना मिळाले असून, येथील अंतर्गत अनेक रस्ते यात घेण्यात आले आहेत. यादीत तब्बल १२८ रस्त्यांचा समावेश असून, घोडबंदर रोड, शहर, कळवा, मुंब्रा, वागळे, लोकमान्य नगर, आदींसह शहरातील इतर सर्वच रस्त्यांचा यात समावेश आहे. यामध्ये काही रस्ते सिमेंट काँक्रीटचे, काहींचे डांबरीकरण, तर काही रस्ते युटीडब्ल्युटी पद्धतीने केले जाणार आहेत.
शहरातील विविध चौकांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून १२० कोटींचा निधी मंजूर झाला. शहराच्या विविध भागात असलेल्या मुख्य २८ चौकांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. याशिवाय शहरात येताना लागणाऱ्या प्रवेशद्वारांचेदेखील सुशोभीकरण केले जाणार आहे. यात झोन एक व झोन दोन मधील आठ प्रवेशद्वारांचा समावेश आहे.
कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली होती. शहरातील विकासकामांना खीळ बसली होती. पालिकेच्या तिजोरीतून केवळ अत्यावश्यक स्वरुपाची कामे केली जात होती. त्यामुळे विकासकामांना निधी मिळण्यासाठी राज्य शासनाचे दरवाजे ठोठावण्यात आले होते. त्यास भरघोस निधी उपलब्ध झाला आहे.
नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांनी हा निधी शहरासाठी उपलब्ध करुन दिला आहे.
- नरेश म्हस्के, महापौर ,ठामपा