ठाणे : बलात्काऱ्यांना राजश्रय देण्याचे काम सरकार करत आहे असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणला जात आहे मात्र हा कायदा महिलांना संरक्षण देण्याच्या ऐवजी गुन्हेगारांनाच पाठीशी घालण्यासाठी होत असल्याचा त्या म्हणाल्या.ठाणे महापालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचऱ्यासोबत ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त यांनी अश्लील वर्तन केले असल्याचे प्रकरण त्यांनी उजेडात आणले असून हे एक प्रकरण नसून महाराष्ट्रात आशा प्रकारे महिलांवर अत्याचार होत असून ठाण्याच्या प्रकारणाबरोबरच सर्वच प्रकरणात भाजप महिलांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
ठाणे महापालिका मुख्यालयातील भाजपच्या गटनेते कार्यालयात पत्रकार परिषदेत चित्रा वाघ बोलत होत्या. पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी कोव्हीड हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचऱ्यासोबत अश्लील वर्तन केले असल्याचे प्रकरण वाघ यांनी माध्यमांसमोर आणले आहे.ठाणे महापालिकेच्या कोव्हीड रुग्णालयात जून 2020 रोजी एका मुलीची स्टाफ नर्स म्हणून नियुक्ती केली.त्यानंतर तिचे काम बघून तिला असिस्टंट मेट्रेन म्हणून देखील बढती दिली. मात्र वर्षभरातच कागदपत्र योग्य नसल्याचे करण देत तिला कमी करण्यात आले.या सर्व प्रकरणामागे या मुली सोबत पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी अश्लील वर्तन केले असल्याचे आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे .या मुलीला न्याय देण्यासाठी भाजप पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
केवळ ठाण्यातच नव्हे तर सातारा आणि संपूर्ण महाराष्ट्रात असे प्रकार सुरू असल्याचे यावेळी वाघ यांनी सांगितले.उपायुक्त केळकर यांना अजूनही सेवेत ठेवण्यात आले असल्याने त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी वाघ यांनी यावेळी केली.यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, ठाणे महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे उपस्थित होत्या.
पालिका आणि पोलीस आयुक्तांची घेतली भेट...या संदर्भात पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा तसेच पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची देखील चित्रा वाघ यांनी भेट घेतली.पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून ठाणे पालिका आयुक्तांनी विशाखा समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्राचा सायबर सेल झोपला आहे का ?प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी या अनेक विषयांवर आपली मते व्यक्त करत असतात. मात्र बाईच्या दिसण्यावरच बोलले जाते तिच्या असण्यावर कधीच बोलले जात नाही.ती किती चांगली अभिनेत्री आहे हे बोलायचं सोडून काही तरी विकृत बोलले जाते.आधीच रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे आता सोशल मीडियावर देखील हेच करणार का असे सांगत महाराष्ट्राचा सायबर सेल झोपला आहे का ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.