भिवंडी: भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून,अचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा निहाय ९ असे एकूण ५४ भरारी पथके २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी गुरुवारी प्रांत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे व जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते.
भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून ३ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ४ मे रोजी उमेदवारी अर्ज छाननी,६ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून २० मे रोजी मतदान तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील सावद येथील प्रशस्त गोदामात स्ट्रॉंग रूम बनविण्यात येणार असून ईव्हीएम मशीन याच ठिकाणी ठेवण्यात येणार असून मतमोजणी देखील याच ठिकाणी होणार आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात या वर्षी एकूण २० लाख ३९ हजार ४४९ मतदारांची नोंद करण्यात आली असून येत्या ३ मे पर्यंत मतदार नाव नोंदणीची मुभा असल्याने ही मतदार संख्या अजूनही वाढणार आहे.या मतदारांमध्ये ८५ वर्षांवरील १७ हजार ९५ मतदार असून व दिव्यांग मतदार ९०८९ असून या निवडणुकीत प्रथमच ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या नागरिकांना टपालाद्वारे मातदान करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे.या निवडणुकीसाठी २१८९ मतदान केंद्र असणार असून यामध्ये मुरबाड विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ५११ मतदान केंद्र असल्याची माहिती जाधव यांनी यावेळी दिली आहे.
निवडणुकी संदर्भातील तक्रारी करण्यासाठी, उमेदवारांच्या मालमत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळवण्यासाठी,मतदाराला आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे तपासण्यासाठी तसेच इतर माहिती देण्यासाठी विविध ऑनलाइन ऍप बनविण्यात आले असून प्रथमच उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा ऑनलाइन ॲप विकसित करण्यात आलेले आहे.आचारसंहिता भंग केल्या संदर्भातील तक्रारी ऍपवर प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण पुढील १०० मिनिटांमध्ये करण्यात येणार आहे. तर या निवडणुकीत उमेदवारास निवडणूक खर्च मर्यादा ही ९५ लाख रुपये करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी यावेळी दिली आहे.
निवडणूक कालावधीमध्ये विविध तक्रारी संदर्भात मुख्य निवडणूक कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून त्या साठी टोल फ्री क्रमांक १८०० २३३ १११४ हा सुरू करण्यात आला असून तो २४ तास सुरू राहणार असून या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढीसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम हे या कालावधीत सुरू राहणार असून समाजाने सुद्धा मतदान प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे.