- डोंबिवलीतील दोन दिवसीय डॉक्टर परिषदेचा समारोपडोंबिवली: आरोग्याची धोरण सरकारी बाबुंनी ठरवू नयेत. त्यामुळे अंमलबजावणी करतांना अनेक अडथळे येतात असे आवाहन महाराष्ट्र मेडीकल असोसिएशनचे डॉ. यशवंत देशपांडे यांनी केले. डोंबिवलीतील दोन दिवसीय ठाणे जिल्ह्यातील डॉक्टर परिषदेचा समारोप रविवारी झाला. त्याआधी पत्रकारांसमवेत बोलतांना वरील आवाहन करत शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली. विविध ठिकाणची स्थानिक परिस्थिती वेगवेगळी असते. पण तरीही सर्वच डॉक्टर नियमांनूसार काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा दावा डॉ. देशपांडे यांनी केला.सरकारच्या कमकुवत धोरणांचा त्रास डॉक्टरांना होत असल्याचे अनेकदा नीदर्शनास आले आहे. त्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला जातो, पण बदल मात्र होत नाहीतच ही खंत त्यांनी व्यक्त केली. आयएमएचे प्रतिनिधी सर्वत्र रुग्णांना चांगलीच सेवा देण्यासाठी तत्पर असतात. पण रुग्णालयांवर होणारे हल्ले, डॉक्टर्स- नर्सवर होणारे हल्ले हे शोभनिय नाही. सुरक्षा यंत्रणेने त्यासंदर्भात सतर्कता दाखवणे आवश्यक आहे. त्यातही सातत्याने अशा घटना घडत असतील तर ते अडचणीचे होते, डॉक्टरांच्या मानसीकतेचे खच्चीकरण होत आहे. कल्याणच्या दूर्घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी आहे. असे गढूळ वातावरण असू नये अशी मत विविध डॉक्टरांनी परिषदेत व्यक्त केली. डॉक्टर हा देखिल माणुस असून देव नाही, शास्त्राचा आधार घेत डॉक्टर रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. कोणताही रुग्ण बरा होऊ नये असे कोणत्याही डॉक्टरला वाटत नाही. रोज हजारो-लाखो रुग्ण देशभर सर्वत्र विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात, कधीतरीच उपचारात चालढकल पणा होत असेल म्हणुन सबंध डॉक्टरांवर गालबोट लागता कामा नये अशीही अपेक्षा या परिषदेदरम्यान व्यक्त करण्यात आल्याचे इंडियन मेडीकल असोसिएशनचे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. मंगेश पाटे यांनी केले.डॉक्टरांवर होणा-या हल्याची केंद्र सरकार, राज्य शासन यांच्यासह पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी, पोलिसांना गोपनिय विभागामार्फत मिळणा-या माहितीद्वारे डॉक्टरांना सूचित करणे आवश्यक आहे. तसेच मेडीकेअर अॅक्ट २०१० हा काय आहे याची माहिती सर्व डॉक्टरांना करुन द्यावी, जेणे करुन डॉक्टरांवर, रुग्णालयांवर हल्ले झाल्यानंतर तातडीने त्या कायद्याचा आधार घेत गुन्हे दाखल करावेत असे, आवाहन आयएमएच्या महिला पदाधिकारी डॉ. अर्चना पाटे यांनी महिला डॉक्टरांच्या वतीने व्यक्त केले. डॉक्टर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयएमएच्या डोंबिवली शाखेचे राष्ट्रीय पदाधिका-यांनी कौतुक करत, कल्याणच्या हॉस्पिटल हल्ला प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील डॉक्टरांनी दाखवलेली एकजूट महत्वाची होती. त्याबद्दलही सर्व डॉक्टरांचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, डॉ. देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले.
सरकारी बाबुंनी आरोग्य विषयक धोरण ठरवू नयेत - डॉ. यशवंत देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 6:24 PM