ठाणे: करोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये मोठ्या प्रमाणावर जोखीम पत्करून शासकीय यंत्रणा कर्तव्य बजावत आहे. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा, तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर आहे. कर्तव्यावर असतांना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शासन खंबिरपणे असुन त्यांना सर्वोतोपरी सहाय्य करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
शहापुरचे तलाठी नितीन यशवंतराव यांचे कोरोना कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन निधन झाले होते. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेले पन्नास लाखांचे विम्याची रक्कम त्यांच्या कुटुबियांना मंजूर झाली आहे. बुधवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नितीन यशवंतराव यांच्या पत्नी आरती यशवंतराव व मुले आर्या व आराध्य यांना 50 लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपुर्द केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार दौलत दरोडा ऑनलाईन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, भिवंडी प्रांत मोहन नळदकर, शहापुर तहसिलदार निलिमा सुर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
कोविडचे विमा कवच मिळणारे राज्याच्या महूसल विभागातील हे पहिलेच प्रकरण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महसुल विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने कर्तव्यावर असतांना मृत्यू झाला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वाहनचालक आत्माराम अलीमकर (सेवा वर्ग जिल्हाधिकारी कार्यालय) यांना सदर मदत मंजूर झाल्याचा शासन आदेश निर्गमित झाला आहे. तर शिपाई गोपाळ आगीवले यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनास सादर करण्यात आलेला आहे. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हाप्रशासनाने कोरोना काळात शासकीय यंत्रणेने केलेल्या कामाची माहिती दिली. नितिन गुलाबराव यशवंतराव (41) हे तलाठी सजा शहापूर या सजेवर 2018 पासून कार्यरत होते.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रथम कोविड केअर सेंटरचे शहापूर मधील श्री. शिवाजीराव जोंधळे नॉलेज सिटी आसनगाव येथे उभे करण्याकामी तालुक्यातील मुख्यालय सजेचे तलाठी या नात्याने त्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली . सदर जबाबदारीला त्यांनी पुर्णपणे न्याय दिला. तदनंतर श्री. शिवाजीराव जोंधळे नॉलेज सिटी आसनगाव, ता. शहापूर येथे कोविड केअर सेंटर मधील सर्व सुविधांचा समन्वय करण्याची जबाबदारी त्यांचेवर होती. सदर कर्तव्य पार पाडीत असताना त्यांना दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली व त्यातच त्यांचे 11 ऑगस्टला निधन झाले. त्यांचे पश्चात त्यांची पत्नी आरती नितीन यशवंतराव व दोन लहान मुले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना सर्व सहाय्य जिल्हा प्रशासन करेल असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिला.