लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे - समृध्दी महामार्गामुळे जालना, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांचा एकूणच मराठवाडा आणि विदर्भाचा औद्योगिक विकास होणार आहे. या महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ येथून येजा करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. मराठवाड्याला राज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच मराठवाड्यात असलेली ११ धरणे एकमेकांना जोडण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मराठवाडा जनविकास परिषदेच्यावतीने मराठवाडा भूषण व मराठवाडारत्न पुरस्कार सोहळा ऑनलाईन आयोजिला होता. सामाजिक बांधिलकी जपत भरीव कामगिरी करणाऱ्या मराठवाड्यातील व्यक्तींना मराठवाडा भूषण व रत्न असे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शुक्रवारी हा सोहळा झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, संतोष कदम, सचिव डॉ. अविनाश भागवत यात उपस्थित होते.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ऑल्मिपक-पॅराऑलम्पिक संयोजन समितीचे प्रतिनिधी म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडलेले चैतन्य भंडारे, उपजिल्हाधिकारी वशिमा शेख, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल उमेश खोसे, निराधार वृद्ध आणि मुलांचा सांभाळ करणाऱ्या मनोज पांचाळ, कृषी क्षेत्रातील भरीव संशोधनाबद्दल उमेश खरात, मेडिसिन अतिदक्षता विभागात कार्यरत असलेल्या कोंडाबाई भोसले, कोरोना काळात जनजागृती करणाऱ्या डॉ. अमरदीप गरड यांना मराठवाडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाड्याला अनंत भालेराव, गोविंद श्रॉफ यांच्यासारख्या नेत्यांचे नेतृत्व लाभले. तेव्हापासून मराठवाडा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, भौगोलिक वारशात योगदान देत आहे. सध्या आपण कोरोनाची लढाई लढतो आहोत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैयक्तिक सुख- दुखे बाजूला ठेवून काम केले, त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवडही सार्थ आहे, असे शिंदे म्हणाले.
तर कोरोनाविरोधी लढाईत मी एकटा लढलो नाही. त्यामागे डॉक्टरांची, आरोग्यसेवकांची फौज आहे, तसेच मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचीही या लढाईत साथ लाभली, त्या सर्वांचे योगदान असल्याने त्या सर्वांना मी हा पुरस्कार समर्पित करतो, अशा भावना राजेश टोपे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. कार्यक्रमादरम्यान दिवंगत कार्यकर्ते माधवराव नाईक, प्रा. तु.शं. कुलकर्णी, पत्रकार सोपान बोंगाणे, सुभाष सपाटे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.