ठाणे : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर महिलांच्या सन्मानासाठी विविध संस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य विभागानेदेखील महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्राची निर्मिती केली आहे. या केंद्रांवर महिलांचे लसीकरणाबरोबरच मानसिक समुपदेशन आणि आरोग्यविषयक जनजागृती अथवा घेण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेत महिलांच्या आरोग्याला प्राधान्य दिले असल्याची माहिती उपसंचालक आरोग्य विभाग, मुंबई डॉ. गौरी राठोड यांनी दिली. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
ठाणे जिल्ह्यात जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील महिलांसाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण भागात पाच लसीकरण केंद्र सुरू केले आहेत, तसेच प्रत्येक महापालिका क्षेत्रात पाच या प्रमाणे सहा महापालिका क्षेत्रात ३० महिला लसीकरण केंद्र सुरू केले असल्याची माहिती राठोड यांनी दिली. त्यामुळे लसीकरणासाठी या केंद्रांवर जाणाऱ्या महिलांना वेगळा अनुभव येणार आहे. आरोग्य विभागाकडून महिलांसाठी नेहमी विविध उपक्रम राबवित असतो, त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक हे नेहमी प्रयत्नशील असतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलांसाठी लसीकरणासह त्यांचे एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मानसिक समुपदेशनदेखील करणार आहे. याशिवाय नर्सिंग कॉलेजमध्ये असणाऱ्या नर्स शिक्षिका अथवा नर्स विद्यार्थिनी या कोविडसारख्या परिस्थिती असो अथवा कोणतीही आपत्ती असो या सर्व परिस्थितीमध्ये लढा देत असतात. त्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा दंत चिकित्सक डॉ. अर्चना पवार यांच्यासह डॉक्टर्स व परिचारिका उपस्थित होत्या. यावेळी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने रुग्णालयातील एएनएम सुगंधा घरात, अधिपरिचारिका हेमंगिनी जाधव आणि वैशाली पवार यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.