कल्याण : कल्याण शहर परिसरातील असमान रस्ते आणि खड्ड्यांमुळे पाच जणांचा नाहक बळी गेल्याच्या निषेधार्थ मनसेने मंगळवारी केडीएमसी मुख्यालयावर भव्य मोर्चा काढत जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कारवाईची मागणी केली. कल्याण-डोंबिवली शहरांना खड्ड्यात घालणाºया सत्ताधाºयांनो ‘चले जाव’ यांसह महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ अन्य दिलेल्या घोषणांनी महापालिकेचा परिसर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता.कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून काढलेल्या मोर्चामध्ये मनसेचे अनेक पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. तर खड्ड्यात पडून जखमी झालेल्या डी. एस. बागवे, साईप्रसाद जोशी आणि मुन्नाकुमार या डोंबिवलीत राहणाºया तिघांनीही मोर्चात सहभाग घेत महापालिकेविरोधातील आपला रोष व्यक्त केला. ‘राम नाम सत्य है..सत्ताधारी पैसे खाण्यात व्यस्त है...’, ‘२२ वर्षे केले काय?,’ ‘खाली डोकंवर पाय...१०० नगरसेवक, दोन खासदार, दोन मंत्री...एवढी माणसं करतात काय?’, ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, शिवसेना भाजप भ्रष्टाचाराचा अड्डा’ आदी प्रकारची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी सत्ताधारी आणि प्रशासनाच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. मोर्चा महापालिका मुख्यालयाकडे येत असताना मध्येच जोरदार पावसाला सुरुवात झाली. परंतु, न थांबता मुसळधार पावसातही मोर्चा पुढे सरकत होता.महापालिकेच्या परिसरातील रस्त्यावरच मोर्चेकरांना पोलिसांनी रोखून धरले. तुर्भे आणि मंत्रालयाच्या परिसरात झालेल्या आंदोलनाप्रमाणे कल्याणमधील आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात होता. कल्याण-डोंबिवली मनसेचा संयुक्त मोर्चा असल्याने डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलिस ठाण्यातील कुमकही मागविण्यात आली होती. परंतु, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.या मोर्चात मनसे सरचिटणीस राजन गावंड, माजी आमदार प्रकाश भोईर, उपाध्यक्ष काका मांडले, राजेश कदम, महापालिका विरोधी पक्षनेते मंदार हळबे, जिल्हाध्यक्ष तथा गटनेते प्रकाश भोईर, उल्हास भोईर, मनोज घरत, उर्मिला तांबे, शीतल विखणकर आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.>प्रशासनाला १५ दिवसांची डेडलाइनमनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. या वेळी खड्डे आणि त्यामुळे गेलेल्या बळींप्रकरणी आयुक्तांसह संबंधित विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. या वेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे?, असा सवालही करण्यात आला. मनसे पदाधिकाºयांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती पालिका आयुक्तांवर केली. वरिष्ठ अधिकाºयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत तसेच खड्डे बुजवून दोषी अधिकाºयांवर कारवाईच्या मागणीसाठी मनसेने आयुक्तांना १५ दिवसांची डेडलाइन दिली आहे.
सत्ताधाऱ्यांनो, चालते व्हा!, खड्ड्यांच्या निषेधार्थ केडीएमसीवर धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 3:57 AM