मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या आझादनगरजवळील आरक्षण क्र. १२२ मधील बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन आणि कलादालनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसे आदेश मुख्य सचिवांना दिल्याचे सांगून यामुळे कलादालनाचे काम लवकर सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.भाईंदर पूर्वेच्या खेळाचे मैदान आणि सामाजिक वनीकरणाच्या आरक्षणापैकी खेळाच्या मैदानातील १५ टक्के भागात बाळासाहेब ठाकरे कलादालन बांधण्याची मागणी सरनाईक यांच्यासह शिवसेनेने सतत चालवली होती. महासभेच्या मंजुरीनंतर २०१८ मध्ये राज्य शासनानेही मैदानाच्या १५ टक्के क्षेत्र इतके बांधकाम करण्यास बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवनला मान्यता दिली होती. त्याची निविदा प्रक्रिया झाली. खासदार राजन विचारे यांनी २५ लाखांचा खासदार निधी, तर सरनाईकांनी २५ लाखांचा आमदार निधी दिला. स्थानिक शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी प्रत्येकी साडेबारा लाखांप्रमाणे ५० लाखांचा निधी देण्याची तयारी दर्शवली होती. पण, तत्कालीन भाजपा आमदार नरेंद्र मेहता व सत्ताधारी भाजपने स्थायी समितीमध्ये बाळासाहेबांच्या सांस्कृतिक भवनच्या कामाची निविदा सातत्याने नामंजूर केली. गेल्या वर्षी संतप्त शिवसेना नगरसेवक-पदाधिकारी यांनी स्थायी समिती सभागृहासह महापौर, आयुक्त दालनात तोडफोड केली होती.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन समिती सभागृहात ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली असता, आ. सरनाईक यांनी नियोजित कलादालनाला सरकारकडून २५ कोटींचा निधी देण्याचा मुद्दा मांडला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मागणीला पाठिंबा दिला. त्यावेळी २५ कोटींचा निधी देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे उपस्थित होते.कलाकारांना हक्काची जागामीरा-भार्इंदर शहरातील कलाकार, कलाप्रेमी यांच्यासाठी ही हक्काची आणि कायमस्वरूपी प्रेरणा देणारी वास्तू ठरेल. विविध सांस्कृतिक, साहित्यिक उपक्र म नागरिकांना राबवता येतील. परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन असे कार्यक्र मही करता येतील. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीच्या धर्तीवर प्रदर्शनासाठी जागा, तर नेहरू तारांगणच्या धर्तीवर विज्ञान प्रदर्शनाची सोय येथे असेल, असे सरनाईक यांनी सांगितले.कलादालनात या सुविधा असतीलकलादालनात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, जुनी पुस्तके असलेले भव्य ग्रंथालय, लहान मुलांसाठी विविध उपक्र म राबवण्याची जागा, विज्ञानाची आवड असलेल्या मुलांसाठी विशेष कक्ष, संग्रहालय, ई-लायब्ररी व कलेचे प्रदर्शन भरविण्यासाठी या कलादालनात जागा, मूर्तिकलेसाठी विशेष दालन अशा अनेक सुविधा असणार आहेत. भाषणांसाठीही विशेष कक्ष असणार आहे.
कलादालनासाठी शासनाचा २५ कोटींचा निधी, प्रताप सरनाईक यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:02 AM