वसंत पानसरे किन्हवली : शहापूर तालुक्यातील दुर्गम गाव असलेल्या वाऱ्याचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील एका वर्गात शिक्षक प्रमोदआणि शर्मिला पाटोळे यांनी स्वखर्चाने दोन वातानुकूलित यंत्रणा बसवल्या आहेत. जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की, गळके छप्पर, भिंतींना गेलेले तडे असे समीकरणच झाले आहे. परंतु, याला बगल देत संपूर्ण आदिवासी वस्ती असलेले गाव, सर्व पालक हे शेतकरी, कष्टकरी असून अशा पालकांच्या मुलांसाठी एका वर्गात वातानुकूलित यंत्र पाटोळे यांनी बसवले आहे.
आदिवासींच्या मुलांना चांगल्या शाळेचे वातावरण देण्यामागे हीच प्रमुख भावना आहे. वातानुकूलित वर्गात बसून मुले शिकत आहेत. कंटाळा न करता मुले दिवसभर छान अभ्यास करतात. संध्याकाळी घरी जाण्याची घाई न करता जास्त वेळ शाळेत बसून आपल्या ज्ञानात वाढ करत आहेत. लॅपटॉप, प्रोजेक्टर, अॅन्ड्रॉइड मोबाइलद्वारे शिकत आहेत. त्यामुळे नव्या ज्ञानाचा या ग्रामीण विद्यार्थ्यांना अतिशय सुयोग्य पद्धतीने परिचय होत आहे.
शाळेविषयी प्रेम, ओढ, जिव्हाळा विद्यार्थ्यांना वाटू लागला आहे. कुणालाही कंटाळा येत नाही. एकंदरीत वातानुकूलित वातावरणाचा आमच्या शाळेला शैक्षणिक बाबींसाठी उपयोग होत आहे. - प्रमोद पाटोळे, मुख्याध्यापक
आदिवासीपाड्यावरील मुलांना उत्तम दर्जाचे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात शिक्षक पाटोळे दाम्पत्य यशस्वी झाले आहे. विद्यार्थी अतिशय आनंदाने शाळेत जातात. दोन महिन्यांत या शिक्षकांनी शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. ठाणे जिल्ह्यातील एक हायटेक स्मार्ट शाळा आणि विद्यार्थी बनवण्याचा त्यांचा मानस आहे. - विठ्ठल शिवारे, ग्रामपंचायत सदस्य