बिर्लागेट : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत प्रचाराची रणधुमाळी उडाली असतानाच कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचीही त्यामध्ये भर पडली आहे. या पंचायतींच्या २१८ जागांसाठी ४४९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ३४ जागा बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.नडगाव-दाणबा, म्हसकळ, घोटसई, आपटी, म्हारळ, निंबवली, बेहरे, बापसई, कांबा, जांभूळ, मानिवली, वडवली, शिरढोण, राया-आंजर्ली, गोवेली, रायते, गुरवली, वरप, दहागाव आदी २३ ग्रामपंचायतींपैकी वाहोली गावाच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला, तर दहागावात पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज न आल्याने २१ ग्रामपंचायती निवडणूक होत आहे. यासाठी ७१२ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २५३ उमेदवारांनी माघार घेतली तर अनेकांचे अर्ज छाननीमध्ये बाद ठरले. यामुळे अखेर २१८ जागांसाठी ४४९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले. यापैकी ३४ उमेदवार बिनविरोध झाले. मात्र, या वेळी एकही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आले नाही. तथापि, २१८ जागांसाठी ८३ मतदान केंद्रे असून सर्वाधिक २२ केंद्रे म्हारळ गावात आहेत. १२० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे नायब तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सांगितले. (वार्ताहर)
ग्रा.पं. जागा २१८; उमेदवार मात्र ४४९
By admin | Published: October 24, 2015 1:23 AM