कल्याण : केडीएमसीच्या ३१२ वाहनांमध्ये लवकरच जीपीएस प्रणाली बसवली जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आपल्या वाहनांवर वॉच ठेवता येईल. स्थायी समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या सभेत प्रशासनाकडून यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे. ही यंत्रणा बसवणे, त्याची देखभाल व दुरुस्तीसाठी एक कोटी ४२ लाख १७ हजार १०० रुपयांचा खर्च महापालिकेला येणार आहे.वाहनांवर ट्रेकींग सिस्टीम बसवण्यास २९ सप्टेंबर २०१६ च्या महासभेत मान्यता मिळाली आहे. यादृष्टीने महासभेपुढे सादर केलेल्या अर्थसंकल्पीय सादरीकरणात ई-गव्हर्नन्स अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन व वाहन विभागातील वाहने यांच्या महापालिका हद्दीत होणाऱ्या फेऱ्यांचे ट्रेकींग करण्यासाठी जीपीएस प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादृष्टीने मागवलेल्या निविदांमध्ये केपीएमजी अॅडव्हायझरी सर्विसेस प्राइव्हेट लि. या संस्थेची न्यूनतम दराची निविदा प्रशासनाकडून मान्य करण्यात आली आहे. वाहनांसाठी जीपीएस प्रणाली, रेडीओ फ्रिक्वे न्सी कार्यान्वित करणे आणि नोंदी ठेवणे, जीपीएस आणि रेडीओ फ्रिक्वेन्सीशी सांगड घालणारे जीपीएस बेस्ट अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार करून कार्यान्वित करणे, कार्यान्वित केल्यानंतर ३ वर्षांची देखभाल व दुरुस्ती करणे, वाहनांचे मार्ग, विविध कलेक्शन पॉइंट्स, वाहनांची वाहतूक इत्यादी बाबींचे व्यवस्थापन करणे, वाहनांची देखभाल, वाहनांवर व पार्किंग व डम्पिंग यार्डच्या गेटसवर रेडीओ फ्रिक्वेन्सीचा वापर करणे आदी कामे केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)
केडीएमसीच्या वाहनांवर ‘जीपीएस’
By admin | Published: March 31, 2017 5:43 AM