सुरेश लोखंडेठाणो : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामधील ज्या शिधापत्रिकाधारकांनी सहा महिन्यांपासून रेशनिंग दुकानांतून त्यांच्या धान्याचा लाभ घेतला नाही, अशा एक लाख नऊ हजार ९०५ कार्डधारकांपैकी तब्बल ९४ हजार ९०७ कार्डधारकांचा अन्नधान्यपुरवठा आता कायमचा बंद केला आहे. त्यांच्या या अन्नधान्याचा लाभ कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये नोकरीस मुकलेल्या गरजू कुटुंबीयांना वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
‘जिल्ह्यात दीड लाख शिधापत्रिका बंद करण्याच्या हालचाली’ या मथळ्याखाली लोकमतने १८ नोव्हेबर रोजी वृत्तप्रसिद्ध करून प्रशासनाच्या हालचाली उघड केल्या होत्या. यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांच्या जागी गरजू कुटुंबीयांच्या नावांचा समावेश करून त्याना या अन्नधान्याचा लाभ दिला जाणार आहे. सहा महिन्यांत एकदाही त्यांनी अन्नधान्य खरेदी केलेले नाही, अशा शिधापत्रिकाधारकांचे आता अन्नधान्य बंद केले आहे.
ग्रामीण भागातील सुमारे एक लाख ४८ हजार कार्डधारकांपैकी बहुतांशी सधन कुटुंबांकडून स्वस्त धान्य खरेदी केले जात नाही, तर शहरी भागातील प्राधान्य कुटुंब यादीतील सात लाख ४४ हजार ४७७ कार्डधारकांपैकी पाच लाख १६ हजार ७७५ कार्डधारक दरमहा अन्नधान्य खरेदी करत असल्याचे दिसत आहे.
लवकरच बडगा
जिल्ह्यातील या साडेसात लाख कडधारकांपैकी अंत्योदय योजनेचे शहरी भागात १३ हजार १३० लाभार्थी आहेत. त्यापैकी ११ हजार ६२६ लाभार्थी आहेत. शिधावाटप विभागाच्या ‘फ’ परिमंडळ विभागाने कारवाई करून आजपर्यंत ९४ हजार ९०७ कार्डधारकांवर ‘एनईआर’ कारवाई केली आहे. सहा महिन्यांपासून अन्नधान्याची उचल न केलेल्या या कार्डधारकांपैकी ८६.३५ टक्के कुटुंबीयांवर कारवाई झाली आहे. उर्वरित १४ हजार ९९८ या ३५ टक्के कार्डधारकांवर ही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.